Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

ओणी येथे २९ ऑगस्टला जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा

Advertisements

राजापूर: ओणी (ता. राजापूर) येथील कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती समितीतर्फे आई आधार केंद्र आयोजित पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा येत्या २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल.

स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. स्पर्धा ओणी येथील नूतन विद्यामंदिराच्या गुरुवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात होणार आहे.

ओणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा गेली १८ वर्षे आयोजित केल्या जात आहेत. जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेचे विषय असे : (गट पहिला) – १. मला हवेत आजी-आजोबा, २. माझी आवडती अंतराळवीर सुनीता विल्यम्स, ३. मज आवडते ही मनापासूनी शाळा, ४. वृक्ष माझा सखा!, ५. कुटुंब रंगलंय……. टीव्हीत!

(गट दुसरा) – १. पुस्तकं माणसाची मस्तकं घडवतात…, २. होय! आम्ही जग बदलू शकतो, ३. वृद्धाश्रम वाढतात तेव्हा संवेदना संपतात का?, ४. घरात जिजाऊ असेल तर अंगणात शिवबा दिसेल! ५. मोबाइलने काय बिघडवलं?

दोन्ही गटांसाठी पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २५०० आणि २००० रुपयांची पारितोषिके दिली जातील. सोबत शील्ड आणि प्रमाणपत्रही दिले जाईल. सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपुरती मर्यादित आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक गटातून दोन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेला येताना मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र व शाळेचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. आपली नावे २७ ऑगस्ट २०२४ पूर्वी स्पर्धा संयोजकांकडे नोंदवावीत. त्यानंतरची नावे नोंद करून घेतली जाणार नाहीत. स्पर्धेसाठी प्रत्येकी ५० रुपये प्रवेश शुल्क राहील. स्पर्धेसाठी किमान वेळ ५ मिनिटे व कमाल ७ मिनिटे राहील. स्पर्धकांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे. स्पर्धकांनी जेवणाची व्यवस्था स्वतः करावयाची आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक मुलांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक वासुदेव शंकर तुळसणकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी विनोद मिरगुले (९९७०९५३६००, ८६६८८१०१७७) किंवा महेंद्र पवार (८१४९१८४८६४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version