राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे कोकण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस रंगणार्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक जागर होणार आहे. या साहित्य संमेलनासाठी कवी केशवसुत साहित्य नगरी सज्ज झाली आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेची राजापूर शाखा, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था, सुप्रभा सहकारी पतसंस्था आणि सुप्रभा वाचनालय (कोंडिवळे) यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, साहित्यिक उत्तम कांबळे हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार असून या संमेलनाचे मंगळवारी (दि. २ जानेवारी) सकाळी साडेनऊ वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. वासुदेव तुळसणकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश देवस्थळी करणार आहेत.
संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुपारी दोन ते चार या वेळेत कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये कोल्हापूर येथील प्रा. आप्पासाहेब खोत, सांगली येथील प्रा. बाबासाहेब परीट हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास पाटील करणार आहेत.
सायंकाळी चार वाजता वेंगुर्ले येथील वीरधवल परब यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. त्यामध्ये खारेपाटण येथील अनिल कांबळी, ओणी येथील संजय कुळ्ये, सावंतवाडी येथील प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, वेंगुर्ले येथील अरुण नाईक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभवडे येथील मोहन कुंभार करणार आहेत. त्यानंतर रात्री लोकजागर अंतर्गत डफावरची शायरी, गजनृत्य, महिलांची टिपरी, फुगडी, गोंधळ, पालखी नृत्य, भोंडला आदी कार्यक्रम होणार आहेत.
बुधवारी (दि. ३ जानेवारी) सकाळी नऊ वाजता मराठी साहित्यातून प्रकटणारे कोकणातील सामाजिक जीवनाचे चित्रण ः किती यथार्थ? या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमामध्ये पंढरपूर येथील प्रा. डॉ. राजाराम राठोड, रत्नागिरीतील प्रा. डॉ. शिवराज गोपाळे, कणकवली येथील नामानंद मोडक सहभागी होणार असून लांजा येथील प्रा. महेश बावधनकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. सकाळी ११ वाजता काव्यवाचन होणार असून त्यामध्ये मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे अकोले येथील प्रसिद्ध कवी अनंत राऊत सादर करणार आहेत. सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे करणार आहेत.
दुपारी तीन वाजता संमेलनाचा समारोप समारंभ संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ओणीसह राजापूर तालुक्यामध्ये साहित्यिक जागर होणार आहे. या साहित्य संमेलनाला सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाहगी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष अॅड. तुळसणकर यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

