ओणीच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर्या यादव, तीर्था निंबाळकर प्रथम

राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आणि आई आधार केंद्र पुरस्कृत कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आज, २९ ऑगस्ट रोजी पार पडली. स्पर्धेत वाटूळ हायस्कूलची आर्या यादव मोठ्या गटात, तर साडवली हायस्कूलची तीर्था निंबाळकर लहान गटात प्रथम आली.

यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे आयोजक आणि संस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, शहाजीराव खानविलकर, नारायण शेलार, संस्था कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, उपाध्यक्ष अरविंद गोसावी, कार्यवाह गुरुदत्त खानविलकर, महादेव धुरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक सौ. नेहा तुळसणकर यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन नारायण शेलार यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन शहाजीराव खानविलकर यांनी केले. प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक तानाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना वासुदेव तुळसणकर म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे व विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या एकमेव उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. स्पर्धा ओणी येथील नूतन विद्यामंदिराच्या गुरुवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात होणार आहे. ओणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा गेली १८ वर्षे आयोजित केल्या जात आहेत. जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचे विषय असे होते : (गट पहिला) – १. मला हवेत आजी-आजोबा, २. माझी आवडती अंतराळवीर सुनीता विल्यम्स, ३. मज आवडते ही मनापासूनी शाळा, ४. वृक्ष माझा सखा!, ५. कुटुंब रंगलंय……. टीव्हीत!

(गट दुसरा) – १. पुस्तकं माणसाची मस्तकं घडवतात…, २. होय! आम्ही जग बदलू शकतो, ३. वृद्धाश्रम वाढतात तेव्हा संवेदना संपतात का?, ४. घरात जिजाऊ असेल तर अंगणात शिवबा दिसेल! ५. मोबाइलने काय बिघडवलं?

स्पर्धेला जिल्हाभरातून दोन्ही गटांत मिळून एकूण ५७ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा गुणानुक्रमे निकाल असा – पाचवी ते सातवी लहान गट – तीर्था विनोद निंबाळकर – साडवली हायस्कूल, आरोही श्रीकांत फडतरे – ओणी हायस्कूल, आरोही सचिन बिर्जे – जि. प. प्राथमिक शाळा करक क्र. १.

आठवी ते दहावी मोठा गट – आर्या उदय यादव – वाटूळ हायस्कूल, रुद्र योगेश बांडागळे – युनायटेड हायस्कूल, चिपळूण, वेदांत प्रदीप राप – साडवली हायस्कूल.

स्पर्धेचे परीक्षण सत्यजित हुजरे, डॉ. संजय मेस्त्री, डॉ. शंकर जाधव, सिद्धेश मिसाळ यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन विनोद मिरगुले यांनी केले. आभार साक्षी शिंदे यांनी मानले.

दोन्ही गटांसाठी पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २५०० आणि २००० रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply