वांद्रे बोरिवली मार्गे मडगाव विशेष रेल्वेगाडी सुरू

नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या वांद्रे ते मडगाव आणि परत या नव्या गाडीचा प्रारंभ आज दुपारी झाला. ही गाडी येत्या ३ सप्टेंबरपासून आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे धावणार आहे.

आज दुपारी बोरिवली रेल्वे स्थानकात शुभारंभ सोहळा पार पडला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह बोरिवली, दहिसर, मागठाणे येथील स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत वांद्रे ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर शुभारंभाची 09167 क्रमांकाची गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. ती गाडी आज, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता रत्नागिरीत येणार असून कणकवलीत मध्यरात्री १२ वाजता, सिंधुदुर्गला मध्यरात्रीनंतर १२ वाजून २० मिनिटांनी, सावंतवाडीला मध्यरात्रीनंतर १ वाजता पोहोचेल. ही गाडी उद्या, शुक्रवारी पहाटे ४ वाजता मडगावला पोहोचणार आहे.

या मार्गावरील नियमित गाडी ३ सप्टेंबरपासून सुरू होईल. वांद्रे मडगाव 10115 क्रमांकाची ही गाडी दर बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी वांद्रे येथून सुटेल. या गाडीचे महत्त्वाचे थांबे आणि वेळ अशी – बोरिवली ७.२३, वसई ८.०५, भिवंडी ८.५०, पनवेल ९.५५, रोहा ११.१५, वीर दुपारी १२.००, चिपळूण दुपारी १.२५, रत्नागिरी ३.३५, कणकवली सायंकाळी ६.००, सिंधुदुर्ग ६.२०, सावंतवाडी ७.००, मडगाव रात्री १० वाजता.

परतीच्या प्रवासात 10116 क्रमांकाची मडगाव वांद्रे गाडी दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाली ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेले. या गाडीचे महत्त्वाचे थांबे आणि वेळ अशी – सावंतवाडी सकाळी ९.००, सिंधुदुर्ग ९.३६, कणकवली ९.५०, रत्नागिरी दुपारी १.३०, चिपळूण ३.२०, वीर सायंकाळी ५.३०, रोहा ६.४५, पनवेल रात्री ८.१०, भिवंडी ९.०५, वसई १०.०५, बोरिवरी १०.४३, वांद्रे रात्री ११.४० वाजता.

गाडीला १५ डबे असतील. त्यांचा तपशील असा २ टायर एसी – १, ३ टायर एसी – २, ३ टायर इकॉनॉमी १, स्लीपर ६, सर्वसाधारण ३, जनरेटर कार १, एसएलआर १.

अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे यश

लोकसभा निवडणुकीपूर्वी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि कोकणाकरिता वसई-सावंतवाडी रेल्वे गाडीची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली होती. माजी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी त्याबाबतचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी ते पूर्ण केले असून वांद्रे टर्मिनस ते मडगाव मार्गावर आठवड्यातून दोनदा गाडी सुरू झाली आहे. श्री. गोयल यांना माजी खासदार विनायक राऊत, विद्यमान खासदार नारायण राणे, खासदार रवींद्र वायकर, खासदार सुनील तटकरे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबाबत त्या सर्वांना धन्यवाद देतो, असे पत्रक अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी प्रसिद्धीला दिले आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरून कोकणासाठी सुरू झालेली गाडी म्हणजे सर्व कोकणवासीयांच्या मागणीला मिळालेले यश आहे, अशा शब्दांत श्री. नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कोकणवासीयांच्या मागणीनुसार ही गाडी जाहीर झाली तरी गाडीला अपेक्षेप्रमाणे थांबे न मिळाल्याने नवी गाडी मिळाल्याच्या आनंदापेक्षा गाडीला देण्यात आलेल्या अपुऱ्या थांब्यांवरून रेल्वेवर प्रचंड टीका होत आहे. ही तुतारी एक्स्प्रेसच्या थांब्याप्रमाणे थांबवून जलद गाडी म्हणून चालवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply