शहाजीराव खानविलकर म्हणजे चालते बोलते विद्यापीठ – म. बा. चव्हाण

राजापूर : इतिहास लिहिणारे अनेकजण असतात, पण इतिहास घडविणारा कुणीतरी एकच असतो. ज्यांनी आपल्या शिक्षकी पेशात सचोटीने काम करत विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांना घडविले, त्यांच्यामध्ये संस्कार रुजवले आणि अनेक आदर्श पिढ्या निर्माण केल्या, ते गुरुवर्य शहाजीराव खानविलकर म्हणजे चालते बोलते विद्यापीठच आहे , असे गौरवोद्गार सेवानिवृत्त मुख्याध्यापक म. बा. चव्हाण यांनी केले.

ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने नूतन विद्यामंदिरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुरुवर्य शहाजीराव खानविलकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी खानविलकर यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्या हस्ते हा जीवन गौरव पुरस्कार खानविलकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख एक हजार १११ रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप होते. खानविलकर यांची ग्रंथतुलाही करण्यात आली.

ओणीच्या गुरुवर्य शहाजीराव खानविलकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर समाजसेवक भाऊ वंजारे, सौ. शीलादेवी शहाजीराव खानविलकर, प्रदीप संसारे, डॉ. महेंद्र मोहन, गणपत भारती, रामचंद्र तुळसणकर, अरविंद गोसावी, महादेव धुरे, अॅड. गुरुदत्त खानविलकर, आत्माराम मेस्त्री, नाथ गांधी, नीलेश खातू, गंगाधर तुळसणकर, महादेव धुरे, प्रमोद लिमये, विवेक सावंत, विजय वागळे, मंगेश खानविलकर, गणपत जानसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भाऊ वंजारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत खानविलकर यांच्या कार्याचा गौरव केला. भाई साखळकर, आत्माराम मेस्त्री, रामचंद्र तुळसणकर, महेश कुमार, महादेव धुरे, गंगाधर तुळसणकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

जीवनगौरव पुरस्कारासाठी कृतज्ञता व्यक्त करताना शहाजीराव खानविलकर यांनी आपल्या विद्यार्थ्यांविषयीच्या असलेल्या भावना व्यक्त केल्या. आजपर्यंत आपल्याला मिळालेले पुरस्कार, आपण केलेले काम व कार्य आणि हा जीवनगौरव पुरस्कार हा माझ्या तमाम विद्यार्थ्यांचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात वासुदेव तुळसणकर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठणींना उजाळा देत खानविलकर यांनी आपल्याला कसे घडविले हे सांगितले. जीवनगौरव पुरस्कार आपणाला देऊन मी कृतार्थ झालो, अशी भावनाही तुळसणकर यांनी व्यक्त केली.

श्री. खानविलकर यांनी संस्थेला एक लाख रुपयांची देणगी दिली. जीवनगौरव पुरस्काराबरोबर त्यांना देण्यात आलेला एक लाख एक हजार १११ रुपयांचा धनादेश त्यांनी संस्थेला परत देत आपण ही देणगी अन्य कोणत्याही संस्थेला द्यावी, असे सांगितले. यावेळी संस्थाध्यक्ष तुळसणकर यांनी शहाजीराव खानविलकर यांनीच सुरू केलेल्या बॅ. नाथ पै ग्रंथालयाला ही देणगी देत असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप संसारे यांनी, सूत्रसंचालन प्रा. विनोद मिरगुले यांनी केले. महेंद्र पवार यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply