Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

दहावीच्या परीक्षेआधी आई-वडिलांचा अपघात; आईचे निधन; तरीही जुळ्या बहिणींनी मिळवले उत्तम यश

Advertisements

मालवण : दहावीची परीक्षा अगदी जवळ असतानाच आई-वडिलांच्या अपघातामुळे त्या दोघींवर मोठे संकट कोसळले. या अपघातात त्यांच्या आईचे दुर्दैवी निधन झाले आणि वडील गंभीर जखमी झाले. अशा कठीण परिस्थितीतही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्धी आणि सिद्धी मांजरेकर या जुळ्या बहिणींनी आपली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले.
मांजरेकर कुटुंब मालवण-भरड येथे वास्तव्याला आहे. समृद्धीने मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूलमधून ८८.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, तर वेताळ बांबर्डे येथे राहणाऱ्या आणि पणदूरच्या शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या सिद्धी हिने ९५.४० टक्के गुण मिळवून शाळेत चौथा क्रमांक मिळवला.

२२ डिसेंबर २०२४ रोजी एका सरकारी योजनेच्या कार्यक्रमाला जाताना कुडाळमध्ये भरधाव कारने जनार्दन मांजरेकर आणि त्यांच्या पत्नी वसुंधरा मांजरेकर यांना जोराची धडक दिली. या अपघातात वसुंधरा यांचे निधन झाले आणि जनार्दन मांजरेकर गंभीर जखमी झाले. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

घरची परिस्थिती साधी असूनही, मांजरेकर दाम्पत्याने मुलांच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली. मोठा मुलगा ऐश्वर्य वकिलीचे शिक्षण पूर्ण करून वकिली करत आहे, तर भाग्यश्री वकिलीचे शिक्षण घेत आहे. समृद्धी आणि सिद्धी दहावीत होत्या. समृद्धी वडिलांच्या हॉटेलच्या कामात आणि आईसोबत शेतीत मदत करत होती, तर सिद्धी गावी राहून शेती, गुरांची देखभाल करत शिकत होती. शाळेसाठी तिने रोज सायकल किंवा एसटीने प्रवास केला.

आई-वडिलांच्या अपघातामुळे दोघींवर मोठा मानसिक ताण आला, अभ्यासात साहजिकच खंड पडला; पण काही काळाने त्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा अभ्यासाला लागल्या. त्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन आणि भावंडांचा आधार लाभला.

समृद्धी आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहते, तर सिद्धी जिल्हाधिकारी बनण्याचा निर्धार ठेवून अभ्यास करत आहे. या जिद्दी बहिणींच्या पुढील शिक्षणासाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी भाग्यश्री मांजरेकर यांच्याशी ७८२१९२७९०९ किंवा ९१५८१४०४०८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version