माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १४ (आचरे न्यू इंग्लिश स्कूलमधील आचरेकर बाई)

आचरेकर बाई

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १४वा लेख आहे शीतल पोकळे यांचा… आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षिका प्रतिभा आचरेकर यांच्याविषयीचा…
………
शंभर वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेली ‘न्यू इंग्लिश स्कूल, आचरा’ ही माझी शाळा! ५० वर्षांपूर्वी शाळेत आठवीत पदार्पण! सर्वच गुरुवर्य प्रेमळ, आदर्शवत! त्याच वर्षी सावंतवाडीहून प्रतिभा सारंग या नव्या शिक्षिका हजर झाल्या. अत्यंत हुशार, संवेदनशील कवयित्री! पहिल्याच दिवशी वर्गात आल्या मराठी शिकवायला. गोड, मार्दवयुक्त आवाज, हृदयस्थ शिकवण्याने पहिल्या बेंचपासून शेवटपर्यंत सगळ्यांचीच मने जिंकली. जिभेवर साक्षात सरस्वती! त्याच दिवशी माझी त्यांच्याशी नाळ जुळली ती शेवटपर्यंत. अभ्यासाबरोबरच इतर सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेण्याकडेही त्यांचा कटाक्ष असे.

लग्नानंतर बाई सौ. आचरेकर होऊन शेजारीच राहायला आल्यावर त्यांचा सहवास जास्त मिळू लागला. रामेश्वर वाचन मंदिरात रोज भेटून उत्तमोत्तम पुस्तकांवर चर्चा, सकस वाचनाची सवय लागली ती कायमचीच! एसएससी परीक्षेत मी उत्तम गुणांनी शाळेत पहिली आले. डोळ्यांत कॉलेजशिक्षणाची स्वप्ने! पण बाबांचं छोटंसं दुकान, लहान भावंडे शिकणारी. मालवणला राहण्याचा, कॉलेज शिक्षणाचा खर्च… आर्थिक गणित जुळत नव्हते. खूप निराश होते. बाईंनी मालवण कॉलेजच्या उपप्राचार्या आजगांवकर मॅडमची भेट घेऊन माझ्यासाठी केलेल्या विनंतीमुळे त्यांनी माझी आपल्याशेजारीच राहाण्याची सोय करून कामत ट्रस्टची लोन स्कॉलरशिप मिळवून दिली. बाईंमुळेच माझे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्णत्वास आले.

पुढील वर्षी मला पोस्ट खात्यामध्ये नोकरीही मिळाली. अजूनही पुढे शिकायची आस होती. तेव्हाही बाईंचं प्रोत्साहन, प्रबळ इच्छाशक्तीमुळे एमए (साहित्य) विशेष श्रेणीत पास झाले, तेव्हा माझ्या आणि बाईंच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू होते. ‘एमए’च्या अभ्यासक्रमातील ज्ञानेश्वरीच्या अभ्यासात बाईंची खूप मदत झाली. शिक्षणाची ओढ असलेल्या अनेक मुलांना ममतेने मार्गदर्शन करून त्यांनी मदतीचा हात दिला.

… पण ‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला.’ दुर्दैवाने २००८ साली बाईंचे कॅन्सरने अकाली निधन झाले. प्रेम, आत्मविश्वास, गुणग्राहकता ही त्यांनी दिलेली शिदोरी घेऊन होतकरू मुलांना प्रोत्साहित करून शिक्षणात मदत करण्याचा वसा मी पुढे चालू ठेवला आहे. हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली व गुरुदक्षिणा आहे!

  • सौ. शीतल नंदकुमार पोकळे (सुवर्णलता वि. बिडये)
    (रिटायर्ड डेप्युटी पोस्टमास्तर, दादर हेड पोस्ट ऑफिस, मुंबई – ४०००१४)
    …..
    (पुढचा लेख गुरुनाथ ताम्हणकर यांचा)
    (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply