ईशाच्या जिद्दीच्या पंखांना आर्थिक पाठबळाची गरज

तळेरे (कणकवली) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळची गडमठ येथील ईशा जयराम सावंत हिने दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. मोलमजुरी करून शिकविणाऱ्या वडिलांचे पांग फेडण्यासाठी तिने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यादिशेने तिचा प्रवासही सुरू झाला आहे. मात्र, तिच्या स्वप्नांना सजग नागरिकांनी आर्थिक बळ देण्याची आवश्यकता आहे.

वैभववाडी तालुक्यातील गडमठ येथील ईशा गेल्या काही वर्षांपासून तळेरे (ता. कणकवली) येथे राहते. ईशाचे सहावीपर्यंतचे शिक्षण तळेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर, सातवीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण तळेरे येथील वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयात झाले. यावर्षी तिने दहावीत ९०.२० टक्के गुण मिळवत आपली गुणवत्ता दाखवून दिली. कोणतीही खासगी शिकवणी नसतानाही तिने हे यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील असूनही स्वत:च्या मेहनतीने हे यश संपादन केले आहे. तिचे वडील मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवत आहेत. ईशाने विज्ञान शाखेमधून उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांना दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे.

ईशा प्राथमिक शिक्षणापासूनच हुशार असून तिने विविध स्पर्धेत यशही संपादन केले आहे. या चिमुरडीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले आहे. तिसरीमध्ये पुण्य्चाया सायन्स फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. एन. सी. सी.मध्ये तिला ए श्रेणी मिळाली असून तिला सांस्कृतिक कार्यक्रमातही रुची आहे.

ईशाने रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. अकरावी विज्ञान शाखेत शिकताना नीट आणि जेईईच्या परीक्षेचा अभ्यास करता यावा, त्याची तयारी व्हावी, यादृष्टीने रत्नागिरीत प्रवेश घेतल्याचे तिने सांगितले.
या सर्व परीक्षांसाठी तिला सुमारे ४ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

ईशाला मदत करायची इच्छा असणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना तिच्या बैंक ऑफ इंडिया, शाखा तळेरे येथील खाते क्र. 147810110005659 (IFSC Code : BKID0001478) मध्ये मदत जमा करता येईल.

(निकेत पावसकर, तळेरे, ता. कणकवली)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply