कोकण मीडियाचा २०२२चा दिवाळी अंक कोकणातल्या उत्सवांवर…; लेख आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन

वेगवेगळ्या दैवतांचे वैभवशाली पारंपरिक उत्सव हे कोकणाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. साप्ताहिक कोकण मीडियाचा २०२२चा दिवाळी विशेषांक याच वैशिष्ट्याला वाहिलेला आहे. ‘कोकणातले उत्सव’ या विषयावर लेख आणि चित्रं मागवण्यात येत असून, सर्वोत्कृष्ट लेख आणि चित्रांना रोख पारितोषिकं दिली जाणार आहेत. सविस्तर वाचा पुढे

निसर्गदेवतेचं वरदान लाभलेल्या कोकणातली एकाहून एक देखणी आणि मनःशांती देणारी मंदिरं पाहिली, की कोकणाला देवभूमी का म्हणतात, याचं कारण वेगळं शोधावं लागत नाही. अशा या वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेशावरचा कोकणी माणूस भक्तिरसाने ओथंबलेला नसता, तरच नवल. त्याच्या या भक्तिभावाला उत्सवप्रियतेची जोड मिळाली आणि वेगवेगळ्या उत्सवांची सुरुवात झाली. कोकणातल्या अनेक गावांमधल्या उत्सवांना १००-१५० किंवा त्याहून जास्त वर्षांची परंपरा आहे. काळानुसार काही बदल झाले असले, तरी ही वैभवशाली परंपरा आजही त्याच भक्तिभावाने जोपासली जात आहे, हे महत्त्वाचं.

करोनाच्या भयाण कालखंडात सारं जगच हादरलं; पण कोकणातल्या माणसाचा जीव जास्त घुसमटला असेल तो या उत्सवांना मुकल्यामुळे. साऱ्या जगाने सोसले तसेच या भीषण संकटाचे फटके कोकणी माणसानेही सोसले, संकटाशी दोन हात केले; पण आपलं गाऱ्हाणं थेट मंदिरात जाऊन देवापुढे मांडता येत नाहीये, याचं दुःख त्याला जास्त झालं असेल. करोनाविषयक नियम पाळून उत्सवात खंड न पाडण्याची जबाबदारी गावागावांतल्या मंडळींनी पेलली; मात्र यज्ञयाग, आरत्या, कीर्तन, भजन, गायन, प्रवचन, व्याख्यान, टिपऱ्या, भोवत्या, गोफ, पालखी, नाटकं, मिरवणुका, जत्रा, नामसप्ताह यांपैकी काहीच नसेल आणि मुख्य म्हणजे माणसंच एकत्र येणार नसतील तर तो उत्सव हो कसला? म्हणूनच करोनाविषयक निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोकणात पहिल्यांदा काय उत्साहाने सुरू झालं असेल, तर ते होते ठिकठिकाणचे उत्सव.

…तर, साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा (२०२२) दिवाळी विशेषांक कोकणाचं वैशिष्ट्य असलेल्या या उत्सवांना वाहिलेला असेल. पालघर ते सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या कोकणातल्या विविध मंदिरांतल्या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवांबद्दलचे लेख त्यात प्रसिद्ध केले जाणार आहेत. काही ठिकाणच्या उत्सवांमध्ये गोफ विणण्यासारखे खेळ खेळण्याची परंपरा आजही टिकवलेली आहे, तर काही ठिकाणी उत्सवात गावातले कलाकार खूप मेहनत घेऊन सुंदर नाटक सादर करतात. कुठे दशावतारी नाट्यप्रयोग होतात, तर कुठे भव्य जत्रा भरतात. कुठे महादेवाच्या मंदिरातला गोकुळाष्टमी उत्सव प्रसिद्ध आहे, तर कुठे लक्ष्मीनारायणाच्या देवळातला आषाढी एकादशीचा उत्सव. कुठे रथोत्सव होतो, तर कुठे हुडोत्सव. एखाद्या गावातली तरुण पिढी पुढे येऊन मधल्या काळात काही कारणाने खंडित झालेली एखादी परंपरा उत्सवात पुन्हा सुरू करते, तर कुठे जुन्या परंपरांच्या जोडीला नव्या परंपराही सुरू केल्या जातात.

उत्तमोत्तम आणि रसाळ कीर्तनं, तल्लीन होऊन केल्या जाणाऱ्या आरत्या, भजनं यांचा आस्वाद तर प्रत्येक ठिकाणच्या उत्सवातच घेता येतो… फरक फक्त त्या त्या ठिकाणच्या प्रथेचा, पद्धतीचा किंवा शैलीचा… भक्तिभाव मात्र सगळीकडे सारखाच! शिवाय, गावागावांतल्या या उत्सवांनी किती गायक, वादक, अभिनेते आणि कार्यकर्ते घडवले आहेत, याचा हिशेब लावता येणार नाही. अशा उत्सवांतून मिळणाऱ्या ऊर्जेची तुलना कशाशीही करता येणार नाही. दिवसा आपापले उद्योगधंदे-नोकऱ्या सांभाळून उत्सवाच्या सलग पाच-सात रात्री ही मंडळी पूर्ण जागरणं करतात, ती ही ऊर्जा मिळवण्यासाठीच. कोकणातली अनेक घरं ओस पडली आहेत, ही खंतावणारी वस्तुस्थिती आहेच; पण गावच्या मंदिरांतल्या उत्सवांना चाकरमानीही वेळात वेळ काढून हौसेने हजेरी लावतात, ही सुखावणारी गोष्ट आहे.

साप्ताहिक कोकण मीडियाचा पहिला दिवाळी अंक (२०१६) गेल्या शतकातल्या आणि शतकापूर्वीच्या कोकणाचा मागोवा घेणारा होता. त्यानंतर कोकणातलं वास्तुसौंदर्य, जलवैभव, बोलीभाषा असे विषय घेऊन अनुक्रमे २०१७ ते २०१९ या वर्षांचे दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात आले. २०२० चा अंक करोनाविषयक अनुभव आणि अन्य साहित्याला वाहिलेला होता, तर २०२१चा अंक रोगप्रतिकारशक्ती या विषयावर होता. करोनाचं संकट अद्याप पूर्णपणे संपलं नसलं, तरी त्याचा जोर आता ओसरला आहे. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा कोकणातल्या वैशिष्ट्यांवर आधारित दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी कोकणातले वैशिष्ट्यपूर्ण उत्सव असा विषय ठरविण्यात आला आहे.

तुमच्याही गावात होतो का असा वैशिष्ट्यपूर्ण आणि मोठी परंपरा असलेला उत्सव? मग त्याबद्दलचा लेख आम्हाला जरूर लिहून पाठवा. उत्सव कोणत्या देवाचा/देवीचा असतो, कोणत्या मंदिरात होतो, अंदाजे कोणत्या साली सुरू झाला, उत्सवाची तिथी, उत्सव सुरू होण्यामागे काही विशिष्ट कारण घडलं होतं का किंवा त्याबद्दलची काही कथा किंवा दंतकथा सांगितली जाते का, उत्सवात आतापर्यंत कोणकोणते उल्लेखनीय उपक्रम राबवले गेले, टिपऱ्या-भोवत्यांसारखे कोणते खेळ खेळले जातात का, नव्या पिढीचा सहभाग कसा आहे, देवाला कौल-प्रसाद लावले जातात का, अन्य ठिकाणच्या उत्सवांपेक्षा वेगळी असलेली उत्सवातली एखादी विशिष्ट परंपरा, कोणते धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यांच्या जोडीला काही सामाजिक उपक्रम राबवले जातात का, कोणत्या कलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम असतात, उत्सवासाठीच्या भोजनात काही विशिष्ट पदार्थ असतो का, उत्सवानिमित्त जत्रा भरते का, नाटक किंवा दशावतारी नाट्यप्रयोग होतात का, काही साहित्यिक कार्यक्रम होतात का, काळानुसार उत्सवात कोणते बदल झाले, गावाबाहेर गेलेल्यांचा सहभाग किती आणि कसा असतो, काही विशेष आठवणी… या आणि अशा अनेक मुद्द्यांवर हा लेख लिहिता येईल. उत्सव ज्या मंदिरात होतो, त्या मंदिराबद्दलची माहितीही जरूर लिहावी.

निवडक लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केले जातील. अंकाव्यतिरिक्त अन्य काही निवडक लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील.

लेखासोबत मंदिराचे आणि उत्सवाची वैशिष्ट्यं दर्शविणारे फोटोही अवश्य पाठवावेत. आधीच्या उत्सवांमधले काही व्हिडिओज असतील तर तेही आवर्जून पाठवावेत, जेणेकरून ते कोकण मीडियाच्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करता येतील.

उत्तम लेखन असलेल्या तीन लेखांना रोख पारितोषिकं दिली जातील. त्याव्यतिरिक्त तीन लेखांना उत्तेजनार्थ पारितोषिकंही दिली जातील.

चित्रकला स्पर्धा : कोकणातल्या चित्रकारांना आणि उदयोन्मुख चित्रकारांना वाव देण्याच्या दृष्टीनं ‘कोकणातले उत्सव’ याच विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. कोकणातल्या चित्रकारांनी स्वतः काढलेलं चित्र स्पर्धेसाठी पाठवावं चित्रं ए-4 आकाराचं आणि उभं (vertical) असावंं. पहिल्या तीन उत्कृष्ट चित्रांना रोख पारितोषिकं दिली जातील. शिवाय ती अंकात समाविष्ट केली जातील.

दंतकथा विशेष : कोकणातल्या प्रत्येक गावाच्या, मंदिराच्या, ठिकाणांच्या दंतकथा/आख्यायिकाही प्रचलित आहेत. अशा कथाही दिवाळी अंकासाठी पाठवाव्यात. त्या गैरसमज पसरवणाऱ्या नसाव्यात. कोणत्याही जातिधर्मांचा, व्यक्तींचा उपमर्द, अवमान करणाऱ्या नसाव्यात. योग्य कथांना प्रसिद्धी दिली जाईल.

साहित्य विशेष : लेख आणि दंतकथांशिवाय कथा, कविता असं साहित्यही कोकण मीडियाच्या दिवाळी अंकासाठी अवश्य पाठवावं. योग्य साहित्याला प्रसिद्धी दिली जाईल. कोकणातल्या कोणत्याही बोलीभाषेत लिहिलेल्या साहित्याचंही स्वागत आहे.

मग पाठवताय ना तुमचं साहित्य! आम्ही वाट पाहतोय!

  • संपादक, साप्ताहिक कोकण मीडिया

साहित्य पाठवण्याची अंतिम मुदत : ३० सप्टेंबर २०२२

ई-मेल : kokanmedia2@gmail.com

फोन/व्हॉट्सअ‍ॅप : 9422382621, 9168912621

पत्ता : साप्ताहिक कोकण मीडिया,
कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर-श्रीनगर,
मु. पो. खेडशी, ता. जि. रत्नागिरी – ४१५६३९

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply