मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तद्वतच महाराष्ट्राला विचारवंत व समाजसुधारकांचीदेखील थोर परंपरा लाभली आहे. संतांनी ईश्वराची ओळख जनमानसात रुजविली. विचारवंतांनी जनतेस वेळोवेळी जागृत करण्याचे आणि समाजसुधारकांनी योग्य दिशा दाखवून त्यांना सामाजिक न्याय व हक्क मिळवून त्यांच्या समस्या दूर करण्याचे महान कार्य केले. एकोणिसावे शतक आधुनिकतेचे मानले जाते. या शतकाच्या पूर्वार्धात मुंबईची भौगोलिक जडणघडण व सामाजिक बदलाची सुरुवात झाली. वसाहतकालीन मुंबईतील धनिक उद्योजकांनी दिलेल्या आर्थिक देणग्यांतून सामाजिक संस्था उभ्या राहिल्या. या संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, तसेच धार्मिक कार्यासाठी लागणार्‍या इमारती उभ्या राहिल्या. या कार्यात ज्या समाजसुधारकांचे योगदान आहे, त्यात जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. समाजबांधवांच्या उद्धारासाठीच्या त्यांच्या योगदानाबाबत आजही अनेक जण अनभिज्ञ आहेत. ३१ जुलै २०२२ रोजी त्यांचा १५६वा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या सामाजिक योगदानाची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नेमके काय करावे लागेल, हे सांगण्याचा प्रयत्न करणारा हा लेख…

नाना शंकरशेट यांचे सामाजिक योगदान समजून घेण्याआधी मुंबईचा संक्षिप्त इतिहास जाणून घेणे उचित ठरेल. मुंबई म्हणजे सात बेटांचा समूह. सन १६७० मध्ये कंपनी सरकार नियुक्त गव्हर्नर ऑगियरने या बेटांच्या निरीक्षणातून भारतातील पहिल्या वसाहतकालीन शहराची कल्पना केली होती. या विखुरलेल्या बेटांना एकसंध करण्याचे कार्य अनुभवी ब्रिटिश गव्हर्नर्स व स्थापत्य अभियंत्यांनी केले. मुंबईच्या पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक बंदराचा विकास पूर्व व पश्चिम किनार्‍यावरील समुद्रात भर घालून जागेचा विस्तार व सुशोभीकरणातून भविष्यातील मुंबईचा पाया घातला गेला. दलदलीत अडकून पडलेल्या बेटांचा कायापालट करण्यास जवळपास १७० वर्षे लागली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सात बेटे इतिहासजमा झाली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबईत मोजक्या इमारती बांधल्या गेल्या. सार्वजनिक सभागृहाच्या गरजेतून बांधलेली टाउन हॉल (एशियाटिक लायब्ररी) ही त्यापैकी एक इमारत होय. ही इमारत १८३३ मध्ये पूर्ण झाली. ह्या इमारतीने अनेक महत्त्वपूर्ण मान्यवर संस्थांना जन्म दिला. आधुनिक मुंबई घडवण्यात या इमारतीने फार मोठी भूमिका निभावली.

सन १८४८ मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून नाना शंकरशेट यांनी सुरू केलेली ठाकूरद्वार येथील शाळा आजही कार्यरत आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आरंभ झालेला नगरविकास व शिक्षणकार्य ह्या दोन घटनांमुळे मुंबईच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. हे दोन्ही विषय नाना शंकरशेट यांच्या आवडीचे होते.

सरकार नियुक्त गव्हर्नर सर बार्टल फ्रियरची कारकीर्द (१८६२-६७) म्हणजे नाना शंकरशेट यांच्या निधनाआधीची तीन वर्षे. १८०३ मध्ये फोर्ट परिसरात लागलेल्या आगीमुळे अनेक जुन्या इमारतींचे नुकसान झाले होते. या संधीचा फायदा घेऊन फ्रियरने संरक्षणाच्या दृष्टीने अनावश्यक असलेली फोर्ट भोवतालची संरक्षण भिंत पाडून नवीन शहरनिर्मितीचे कार्य हाती घेतले. ह्या एतिहासिक घडामोडीतून भारतातील पहिल्या आधुनिक शहराचा उदय झाला. तेव्हापासून देशभरातील प्रांतांतून व्यापारउदीम, तसेच उद्योगधंदा करू इच्छिणार्‍यांचा ओघ सुरू झाला. या दरम्यान कष्टकरी जनतेचेही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. एकाअर्थी आधुनिक मुंबईला जन्म देण्याचे व गव्हर्नर ऑगियरने कल्पिलेल्या भारतातील पहिल्या वसाहतकालीन शहराचे स्वप्न साकार करण्याचे दुहेरी श्रेय गव्हर्नर फ्रियरला जाते.

गव्हर्नर फ्रियरच्या कारकिर्दीत विकसित झालेल्या परिसराचा आवाका मुंबईच्या दक्षिणेकडील रीगल सिनेमा ते उत्तरेकडील क्रॉफर्ड मार्केट इतकाच होता. कालांतराने कला-सौंदर्यपूर्ण वास्तुशैलीत निरनिराळ्या सरकारी व खासगी इमारती उभ्या राहिल्या. त्याने दिलेल्या भरीव योगदानाप्रीत्यर्थ काही काळ ह्या परिसराची ओळख फ्रियर टाउन अशी होती.

१० फेब्रुवारी १८०३ रोजी जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे यांचा जन्म दैवज्ञ (सोनार) ज्ञातीत झाला. त्या काळात सार्वजनिक शिक्षणाची सोय नव्हती. त्यांचे सर्व शिक्षण उत्तमोत्तम गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली झाले. मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या वयाच्या तिसर्‍या वर्षी आईचे, तर अठराव्या वर्षी वडिलांचे निधन झाले. अल्पावधीतच त्यांनी आपल्या वडिलोपार्जित धंद्यात जम बसवला. बरोनेट जिजीभाई जमशेटजी, करसेटजी फ्रामजी ह्यांचाशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. जिजीभाई त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. त्यांच्यातील मैत्रीपूर्ण स्नेह व जिव्हाळा सर्वांना परिचित होत्ता. समकालीनांमध्ये ते ‘नाना’ नावाने परिचित होते.

नगरविकास व शिक्षण हे दोन्ही विषय नाना शंकरशेट यांच्या आवडीचे होते. परंतु आपले समाजकार्य या दोन क्षेत्रांशी मर्यादित न ठेवता त्यांनी समाजातील अनेक प्रश्न हाताळले. त्यात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, इत्यादी क्षेत्रांचा समावेश होता. सर्वसामन्यांच्या गरजा भागविण्यासाठी सामाजिक संस्थांची जरूरी भासते. त्यांनी एतद्देशीय धनिक सहकार्‍यांच्या मदतीने त्यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागातून अनेक सामाजिक संस्था उभ्या केल्या.

शहर जडणघडणीत दोन घटक महत्त्वाचे असतात. पहिला घटक म्हणजे उत्कृष्ट नगररचना, तर दुसरा म्हणजे उत्तम समाजजीवन. ह्या दोन घटकांच्या परिपूर्णतेतून बनलेले शहर म्हणजे पूर्वीची मुंबई.

सुरुवातीच्या काळातील शहर म्हणजे एक अचेत भूभाग असतो. मानवी संचारामुळे त्यात चैतन्य प्राप्त होते. उद्योगधंद्यास गती मिळावी म्हणून सरकारने अनेक आर्थिक सवलती व प्रलोभने दाखवून वेगवेगळ्या भागातील नागरिकांना आकर्षित केले. त्यामुळे देशभरातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. ह्यात विविध धर्म, जाती, पंथ, भाषा, वेशभूषा व खाद्यसंस्कृती घेऊन आलेले नागरिक होते. ह्या सर्वांना मुंबईने सामावून घेतले. याच कारणामुळे मुंबईचा चेहरा बहुधर्मीय व बहुभाषिक बनला. आजही ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे.

कोणतेही नवीन शहर समस्या घेऊनच जन्मास येते. मुंबईदेखील त्यास अपवाद नव्हती. नेमक्या याच कारणास्तव मुंबईला सामाजिक मार्गदर्शकाची आवश्यकता भासली. शहरविकासात पायाभूत सुविधांचे जितके महत्त्व असते, तितकेच महत्त्व नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांना असते. सुरुवातीला त्यांनी आपापले प्रश्न वैयक्तिक, तसेच सामूहिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अनेक अडचणी येत. तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांना नागरिकांच्या समस्या सोडविणात आस्था नव्हती. ह्या समस्येचे गांभीर्य ओळखून नानांनी सरकारदरबारी जनतेचे प्रतिनिधित्व करून देशबांधवांच्या प्रश्नांना वाचा फोडली. ह्या कार्यात नानांनी मुंबईतील अनेक धनिक उद्योजकांना सहभागी केले. त्यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे अल्पावधीत मुंबईची उत्तरोत्तर भरभराट होत राहिली. सामाजिकदृष्ट्या बलवत्तर असलेली शहरे सतत प्रगतिपथावर राहतात हे प्रगत राष्ट्रांतील शहरांच्या भरभराटीतून दिसून येते. भारतातील पहिले वसाहतकालीन मुंबई शहर हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

ह्या सामाजकार्यात जिजीभाई जमशेटजी यांचा सर्वाधिक सहभाग होता. त्यांनी जे. जे. कला व वास्तुकला महाविद्यालय, जे. जे. हॉस्पिटल, बेलासिस रोड येथील धर्मशाळा इत्यादी समाजोपयोगी इमारती उभारल्या. त्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक संस्थांची संख्या १०० पेक्षा अधिक आहे. त्या संस्था आजही कार्यरत आहेत. एल्फिन्स्टन महाविद्यालय, तसेच वीरमाता जिजाबाई उद्यानातील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची इमारत उभी करण्यात नानांचे सर्वाधिक योगदान होते. २०२२ हे या वस्तुसंग्रहालयाचे शतक महोत्सवी वर्ष आहे. तसेच स्वतंत्र भारताचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.

डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची इमारत

शहररचनेत उत्कृष्ट नगररचना व उत्तम सामाजिक जीवन ह्या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक असाव्या लागतात. उत्कृष्ट शहरनिर्मितीसाठी पूर्वानुभव असावा लागतो, तरच ते शहर प्रगतिपथावर कायम टिकून राहते. शहरनिर्मितीच्या दांडग्या अनुभवातून गव्हर्नर फ्रियरने पाच वर्षांत मुंबईचा कायापालट केला. परंतु समाजजीवन घडवण्यासाठी पूर्वानुभवापेक्षा समाजभान असणे गरजेचे असते. दूरदृष्टी व समाजभानातून नानांनी मुंबईतील समाजजीवनास योग्य दिशा दिली. सदैव नि:स्वार्थी राहून त्यांनी आपल्या जीवनातील ४२ वर्षे समाजसेवेत व्यतीत केली. ब्रिटिशांनी सात बेटांना एकसंध करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले, तर नानांनी राज्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध राखून आपल्या समाजकार्याच्या मदतीने मुंबईतील बहुधर्मीय, बहुभाषिक नागरिकांच्या जीवनात सामाजिक एकसंधता साधण्याचे महान कार्य केले. आद्य मुंबईच्या निर्मितीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना ‘मुंबईचे आद्य शिल्पकार’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

सन १८५३ मध्ये मुंबईत पहिली रेल्वे धावली. भारतातील रेल्वेचा शुभारंभ करण्यात दाखवलेली तत्परता व त्यानंतर दिलेल्या भरीव योगदानाप्रीत्यर्थ त्यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून सन्मानित करण्यात आले. १८६३ साली गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या हस्ते खंडाळा येथे बोरघाटाचे उद्घाटन झाले. त्या प्रसंगी केलेल्या भाषणात आरंभकाळातील या घटनेचा, विशेषतः नानांच्या नावाचा उल्लेख त्यांनी गौरवपूर्ण शब्दात केला. त्या वेळी फ्रियर म्हणाले होते, की “मुंबईचे वैभव वाढावे यासाठी झटणारे व ते ज्या ज्या मार्गाने वाढण्यासारखे असेल त्या त्या मार्गाचा अवलंब करण्यात सर्वाधिक पुढे सरसावणारे आमचे सन्माननीय मित्र जगन्नाथ शंकरशेट यांनी इतर अनेक उपक्रमांप्रमाणे हाही (लोहमार्ग सुरू करण्याचा) उपक्रम सुरू करण्याच्या कार्यात प्रामुख्याने भाग घेतलेला आहे.” ह्यावरून त्यांचे समाजजीवनातील महत्त्व समजून येते.

समाजसेवेचे कार्य करत असताना नानांवर सरकारकडून आरोप झाले, संकटे आली, परंतु त्या त्या वेळी घेतलेले अचूक निर्णय, आत्मविश्वास व दांडग्या इच्छाशक्तीमुळे त्यांनी आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध केले. आपल्या संपूर्ण आयुष्यात सदैव विवेकबुद्धी, सचोटी, सामंजस्य या गुणांवर विश्वास ठेवून निष्ठेने आपली सारी कर्तव्ये पार पाडली. समाजातील अनेक प्रश्नांना निश्चित वैचारिक दिशा देण्यात नानांचा सिंहाचा वाटा होता. हिंदू स्मशानभूमीचे स्थलांतर रोखण्याचा यशस्वी प्रयत्न हे त्याचे उत्तम उदाहरण होय. अत्यंत बुद्धिमान, विविधांगी चतुरस्र व्यक्तिमत्व व प्रभावी नेतृत्वगुणांमुळे अल्पकाळातच त्यांची ‘समाजसेवी’ अशी प्रतिमा निर्माण झाली.

त्यांच्या योगदानाप्रति कृतज्ञता म्हणून नाना हयात असतानाच त्यांच्या समकालीन मित्रांनी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. आधुनिक मुंबईच्या उभारणीत विविध गुणांमुळे प्रसिद्ध असलेल्या ज्या देश/विदेशी दिग्गजांचा सहभाग होता त्यांचे पुतळे व तसबिरी एशियाटिक लायब्ररी इमारतीत कल्पकतेने मांडलेल्या आहेत. त्याच इमारतीच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारात संगमरवरी दगडात घडवलेला संपूर्ण भारतीय वेशातील नानांचा पुतळा बसवण्यात आला. इमारत शैली व वास्तुरचनेतील सौंदर्यपूर्ण घटकांचा पुरेपूर लाभ पुतळ्यास मिळाला आहे. प्रवेशद्वारातून दोन्ही दिशांनी पहिल्या मजल्यावर जाणारा विलोभनीय आकारातील वक्राकार दगडी जिना, त्याच आकारात वळण घेणारे रेलिंग, तसेच दुमजली छताच्या शिरोस्थानी असलेल्या तावदानातून परावर्तित होणार्‍या मंद प्रकाशाची पार्श्वभूमी लाभल्यामुळे धीरगंभीर मुद्रेतील नानांचा पुतळा अतिशय प्रसन्न व शोभिवंत दिसतो. परंतु हा सोहळा पाहण्यासाठी नाना जिवंत नव्हते.

नानांच्या निधनाआधी त्यांचा देह अत्यंत प्रसन्न वातावरणात ठेवला होता. अगदी शेवटच्या घटकेपर्यंत त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात भगवद्गीतेचे पठण सुरू होते. शेवटी ३१ जुलै १८६५ रोजी त्यांचे निधन झाले. हिंदू स्मशानभूमीस त्यांनी दान दिलेल्या मरीनलाईन्स येथील जागेत त्यांना विधिपूर्वक अग्नी देण्यात आला. एक द्रष्टा समाजसेवक हरपला.

नानांचे संस्कृत भाषेवर अतोनात प्रेम होते. संस्कृत भाषेच्या अभ्यासाला उत्तेजन मिळावे म्हणून त्यांचे सुपुत्र विनायकरावजी यांनी त्यांच्या नावे शिष्यवृत्तीची सुरुवात केली. ही शिष्यवृत्ती १८६६ सालापासून सुरू आहे. तसेच ग्रँट रोड येथील चौकास व दादर उड्डाणपुलास त्यांचे नाव देण्यात आले. सन १९५९ मध्ये लेखक पु. बा. कुळकर्णी यांनी ‘ना. नाना शंकरशेट यांचे चरित्र काळ व कामगिरी’ हा मराठी ग्रंथ प्रसिद्ध केला. डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकरांनीदेखील इंग्रजी भाषेत ग्रंथ प्रसिद्ध केला. पाचशे पृष्ठसंख्या असलेल्या तीन खंडांत हा ग्रंथ विभागला आहे. डॉ. श्रीनिवास वेदक व रवींद्र माहीमकर इत्यादी लेखकांनीदेखील त्यात भर घातली आहे.

ना. शंकरशेट स्मारक प्रातिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सेक्रेटरी अ‍ॅड. मनमोहन चोणकर व इतर माननीय सदस्यांच्या वतीने त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु अशा कार्यक्रमांचा प्रभाव त्या त्या दिवसापुरताच मर्यादित राहतो असा आजवरचा अनुभव आहे. अपुर्‍या निधीमुळे स्मृती स्मारक इमारतीचे काम पुढे जात नाही. या कामास गती देण्यासाठी विविध मार्गांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

नानांचे चरित्र व स्वभाववैशिष्ट्यांची एकत्र माहिती देणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. तरीदेखील सद्यस्थितीत ग्रंथ हे माध्यम अपुरे आहे. नानांचे योगदान देश-विदेशातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कालानुरूप माध्यमातून प्रयत्नांची व्यापकता वाढवणे आवश्यक आहे. त्या अशा –

  • उपलब्ध पुस्तकांचे ई-पुस्तकात रूपांतर करणे.
  • चरित्रात्मक चित्रपट (biopic film) हे प्रभावी माध्यम ठरू शकते.
  • यू-ट्यूबसारख्या संकेतस्थळांचा वापर.
  • शालेय शिक्षण, स्थापत्य अभियांत्रिकी, स्थापत्यकला महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश.

नाना शंकरशेट यांच्या जीवनाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते, की त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये बहुमोल कार्य केले होते. आपल्या पूर्वसुरींनी आखून दिलेली समाजसेवेत जीवन जगण्याची पद्धती हे सूत्र त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत कायम ठेवले. गव्हर्नर फ्रियरने उत्कृष्ट नगररचनेतून मुंबईस आधुनिक शहर बनवले, तर नाना शंकरशेट यांच्यासारख्या समाजसुधारकांनी मुंबईतील नागरिकांना उत्तम जीवन जगता यावे यासाठी सामाजिक जीवनाचा पाया घातला. मुंबईच नव्हे, तर देशभरातील सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे जमशेटजी जिजीभाई यांनी बांधलेले जे. जे. हॉस्पिटल, प्रेमचंद रायचंद यांनी उभारलेले राजाबाई टावर (मुंबई विद्यापीठ लायब्ररी), नानांच्या मालकी हक्काच्या जमिनीवर उभारलेली मरीनलाइन्स व वाळकेश्वर येथील हिंदू स्मशानभूमी, अशी अनेक उदाहरणे आहेत. आजच्या राजकीय दूरदृष्टीच्या (?) अनुषंगाने, विशेषत: वर्तमान मुंबईत होत असलेला स्वैर विकास व खालावत चाललेला सामाजिक दर्जा पाहता नानांचे मुंबईशी असलेले अतूट नाते व त्यांची सर्वार्थाने ओळख ह्या दोन्ही गोष्टी अभ्यासल्या जाणे महत्त्वाचे वाटते. त्या सर्वांचे योगदान सदैव स्मरणात राहावे म्हणून हा प्रयत्न.

  • आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे, मुंबई

संपर्क : 9819225101

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply