चिपळूण : गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाचे जीवन समजून घेण्यासाठी स्वर्गीय श्रीराम दुर्गे सरांचा ‘गावभवरा’ हा कथासंग्रह आवर्जून वाचायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रेखा देशपांडे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखांच्या संयुक्त विद्यमाने संवेदनशील आणि प्रगल्भ सामाजिक भान असणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम दुर्गे यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमात ‘गावभवरा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन झाल्यावर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आपण मानतो ते ‘स्वर्ग आणि नरक’ असे काही अस्तित्वात नसावे, असे मला वाटायचे. मात्र गावभवरा वाचल्यावर नरक म्हणजे काय, ते कळले. पशुतुल्य जीवन हाही शब्द वापरता येणार नाही, इतके या लोकांचे जीवन भयावह असते. पांढरपेशी मंडळी गावागावात ज्या सुरक्षित वातावरणात वावरतो तो स्वर्ग आहे. हक्काचा आश्रय नसलेली ही मंडळी अशा वस्तीत राहतात की किड’ बरे म्हणावेत, अशी स्थिती आहे. त्यांच्या दु:खाला पारावार नाही. नरक ही संकल्पना म्हणून अंगावर शहारा आणणारी जी रौद्र, बीभत्स वर्णने आपण ऐकतो, ती सारी ‘गावभवरा’मधील कथांमध्ये भेटतात. सामान्यत: वाचवणार नाहीत अशा या कथा म्हणजे शोकांतिका आहेत. प्रचलित व्यवस्थेला प्रश्न विचारणारे काही आशेचे किरण त्यात दिसतात.
डॉ. देशपांडे पुढे म्हणाल्या, कथासंग्रहात भेटणारे वैदू, पारधी, वासुदेव, पिंगळा, लमाणी, गोंधळी, कैकाडी, दरवेशी, मदारी, अस्वलाचे खेळ करणारे, नंदीबैलवाले, भोरपी, बहुरूपी, मसनजोगी आदी भटके लोक उत्तम कलाकार आहेत. परंतु त्यांना पोटासाठी, अन्नासाठी वणवण करावी लागते. पूर्वी या लोकांना राजदरबारात आपल्या कला सादर करण्यासाठी आश्रय आणि प्रतिष्ठा मिळायची. कालांतराने हे सारे मागे पडत गेले. कला दाखवायच्या संधी कमी होत गेल्या. अडचणी वाढल्या. हे लोक गावोगावी फिरू लागली. कालांतराने गावेही ओसाड पडू लागल्यावर, करमणुकीची साधने वाढल्यावर त्यांचे जगण्याचे गणित बिघडत गेले. या लोकांचे जीवन नक्की कसे आहे, याचे दर्शन आपल्याला या कथासंग्रहातून घडते. कोकणात या समूहांची संख्या खूप कमी आहे. गोंधळी, वासुदेव अजूनही आपल्याकडे येतात. आपण बालपणी यांना पाहिले आङे. या कथासंग्रहातील साऱ्या समाजात अंधश्रद्धा प्रचंड आहेत. यांची प्रत्येकाची स्वतंत्र संस्कृती आहे. आख्यायिका जोडलेल्या आहेत. दैवत वेगळे आहे. दैवताचे मिळणारे आदेश वेगळे आहेत. कथेतील समाजांचे सगळे आयुष्य एक शोकांतिका आहे. वाचवत नाहीत अशा या कथा आहेत. आजच्या काळात गाववाले या लोकांना ‘चोर’ समजतात. वास्तविक गावागावात होणाऱ्या चोऱ्या या गावातल्या लोकांनी केलेल्या असतात. मात्र आरोप या लोकांवर केला जातो. अमानुष मारहाण करतात. कोणत्याही कारणाने का असेना, कोणीही वाली नसल्याने मरेपर्यंत मारहाण यांच्या पाचवीला पुजलेली आहे. संग्रहातील दुष्काळाची वर्णने आपल्याला वाचवत नाहीत अशी आहेत. श्रीराम दुर्गे सरांच्या जागल्या, चौथी क्रांती आदी कादंबऱ्या, कथा, कविता प्रसिद्ध आहेत. त्या गाजलेल्या आहेत, वाचनीय आहेत. दुर्गे सरांनी आपल्या लेखनातून समाजव्यवस्थेत असलेल्या भटक्या लोकांच्या जिवंत वेदना मांडण्याचे काम केले आहे. तरीही समाधान न झाल्याने त्यांनी भटक्या लोकांची मनात रेंगाळत राहिलेली दुःखे, वेदना स्वतंत्रपणे मांडण्यासाठी ‘गावभवरा’ कथा लिहिल्या. या कथा वाचताना मन सुन्न होत जाते. अंगावर शहारे येतात. सगळ्या कथांचे कथाबीज हे विदारक सत्य आहे. आपल्या समाजात तीन प्रकारची व्यवस्था असते. पहिली गावकुसाच्या आत राहाणारी, दुसरी गावकुसाच्या बाहेर राहाणारी आणि तिसरी गावकुसाच्या बाहेर असलेल्यांवर अवलंबून असलेल्यांची होय. गावकुसाबाहेरच्या ज्या जाती-जमाती आहेत, त्या गावकुसात राहणाऱ्या लोकांना ‘पाटीलपांडे’ म्हणतात, आपले धनी, मालक मानतात. गावकुसाच्या आत राहणाऱ्यांनी बाहेरच्यांना जगवायचे असते. भटक्यांना गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या मातंग आणि नवबौद्ध समाजाने सांभाळायचे असते. भटक्यांनी कोणत्याही गावात आपले पाल टाकण्यापूर्वी गावाच्या पोलीस पाटलांना आपण आल्याचे कळवायचे, अशा स्वरूपाची मांडणी असलेले वेगळे जग या कथासंग्रहात अनुभवायला मिळते. गावचे पाटील देतील अशा उकिरड्यावर, गटाराच्या कडेला आदी जागांवर यांना पाले ठोकावी लागतात. कोणत्या भटक्या समाजाने कोणत्या गावात केव्हा जायचे, किती दिवस त्या गावात राहायचे, कोणत्या गावात, कोणत्या महिन्यात कोणता कलाकार असेल, कोणत्या जाती-जमातीची पाले पडलेली असतील, याचे अलिखित वेळापत्रक आपल्याला या कथासंग्रहात भेटते. हे सारे वंशपरंपरागत पिढ्यान् पिढ्या चालत आलेले असल्याचे डॉ. सौ. देशपांडे यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भावसुमनांजलीअंतर्गत प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम दुर्गे हे लेखनातील महामेरू होते. भारतवर्षातील ते एक अनुभवसंपन्न लेखक होते. अंगावर शहारा आणणारे लेखन करण्याचे कसब त्यांच्यात होते. ते हळव्या स्वभावाचे होते, असे सांगून गोनबरे यांनी वर्षभरापूर्वी करोना कालखंडातील दुर्गे सरांच्या मृत्यूची मानवी मनाला अस्वस्थ करणारी हकीगत कथन केली. आपल्या मृत्यूनंतर दुर्गे सरांनी ‘गावभवरा’ हा एक एक कसदार कथासंग्रह समाजाला उपलब्ध करून दिल्याचे गोनबरे म्हणाले. यावेळी दुर्गे सरांच्या आठवणी जागवताना संदेश पवार म्हणाले, कोकणातील साहित्यिकांच्या सन्मानाचा विषय दुर्गे सरांनी लावून धरला.
यावेळी प्रा. डॉ. गुलाब राजे, महंमद झारे, मंगेश बापट आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. यतिन यांनी दुर्गे सरांना प्रगल्भ समाजभान असल्याचे म्हटले. भटक्यांमागील ‘माणूस’ शोधून त्यांच्या व्यथा-वेदना मांडण्याचे काम या कथासंग्रहाने केल्याचे त्यांनी नमूद केले. राजेंद्र आरेकर यांनी दुर्गे यांच्याविषयीच्या आपल्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. अन्यायाविरुद्ध बोलताना प्रसंगी दुर्गेसरांना रागाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. दुर्गे सरांचे भाऊ प्रदीप दुर्गे यांनी सांगितले की, हे शेवटचे प्रकाशन लातूरला करायचे होते. मात्र तो कार्यक्रम अचानक रद्द झाला. सरांची बहुतांश साहित्यसंपदा चिपळूण या त्यांच्या कर्मभूमीत निपजली असल्याने आपल्या सर्वांच्या साक्षीने हे शेवटचे प्रकाशन चिपळूणला झाले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, नामवंत कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, शाहीर राष्ट्रपाल सावंत, शशिकांत मोदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. अंजली बर्वे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘भावसुमनांजली’ अंतर्गत प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम दुर्गे सर हे लेखनातील महामेरू होते. भारत वर्षातील ते एक अनुभव संपन्न लेखक होते. अंगावर शहारा आणणारं लेखन करण्याचं कसब त्यांच्यात होतं. ते हळव्या स्वभावाचे होते. असं सांगून गोनबरे यांनी वर्षभरापूर्वी कोरोना कालखंडातील दुर्गे सरांच्या मृत्यूची मानवी मनाला अस्वस्थ करणारी हकीगत कथन केली. आपल्या मृत्यूनंतर दुर्गे सरांनी ‘गावभवरा’ हा एक एक कसदार कथासंग्रह समाजाला उपलब्ध करून दिल्याचे गोनबरे म्हणाले. यावेळी दुर्गे सरांच्या आठवणी जागवताना संदेश पवार यांनी, कोकणातील साहित्यिकांच्या सन्मानाचा विषय दुर्गे सरांनी लावून धरल्याचे नमूद केले. यावेळी प्रा. डॉ. गुलाब राजे, महंमद झारे, मंगेश बापट आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव यांनी दुर्गे सरांना प्रगल्भ समाजभान असल्याचे म्हटले. भटक्यांमागील ‘माणूस’ शोधून त्यांच्या व्यथा-वेदना मांडण्याचे काम या कथासंग्रहाने केल्याचे त्यांनी नमूद केले. राजेंद्र आरेकर यांनी दुर्गे यांच्याविषयीच्या आपल्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. अन्यायाविरुद्ध बोलताना प्रसंगी दुर्गेसरांना रागाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. दुर्गे सरांचे भाऊ प्रदीप दुर्गे यांनी बोलताना हे शेवटचं प्रकाशन लातूरला करायचं होतं असं म्हटलं. मात्र तो कार्यक्रम अचानक रद्द झाला. सरांची बहुतांश साहित्यसंपदा चिपळूण या त्यांच्या कर्मभूमीत निपजली असल्याने आपल्या सर्वांच्या साक्षीने आज हे शेवटचं प्रकाशन झाल्याचे म्हटले.
कार्यक्रम प्रसंगी स्वर्गीय श्रीराम दुर्गे सरांच्या तसबीरीला शाल आणि पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आला. यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, नामवंत कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, शाहीर राष्ट्रपाल सावंत, शशिकांत मोदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. अंजली बर्वे यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

