क्रांतिसूर्य लोकमान्य टिळक

भारताच्या पारतंत्र्याच्या काळातील अत्यंत प्रमुख तीन क्रांतिकारक समजले जातात. लाल, बाल आणि पाल— म्हणजेच लाला लजपत राय [पंजाब], बाळ गंगाधर टिळक [महाराष्ट्र] आणि बंकिमचंद्र पाल [बंगाल] या त्या तीन महान प्रभृती होत. बाळ गंगाधर टिळक बळवंतराव, लोकमान्य टिळक, टिळक महाराज, भगवान टिळक इत्यादी नावांनी जनमानसात सदैव रूढ झाले. अठराशे १८५६ [रत्नागिरी] ते ०१/०८/१९२० (सरदारगृह मुंबई) असा त्यांचा सुमारे ६४ वर्षांचा जीवनकाळ. मधुमेहासारख्या बळावलेल्या दुर्धर व्याधीने फारच अल्प काळात त्यांना इहलोकाचा निरोप घ्यावा लागला. मात्र आयुष्यात लाभलेल्या आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण राष्ट्रकार्यासाठी त्यांनी अक्षरशः वेचला. भारतमातेच्या पारतंत्र्याचे जोखड कायमचे उतरवून स्वातंत्र्याची माळ गळ्यात घालण्याचे त्यांचे अवतार कार्य होते. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शारीरिक व्याधींकडे कधी लक्ष दिले नाही. कारण सरला गेलेला प्रत्येक क्षण परत मागे फिरणार नसल्याचे आत्मज्ञान ते साहजिकच जाणून होते. तेच त्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव वापरले. त्यांच्या अफाट राष्ट्रकार्यातील आठवणींचा निवडक मागोवा.

’केल्याने होत आहे रे…….’ या समर्थांच्या उक्तीनुसार सतत विशिष्ट हेतूने कार्यरत राहून कर्मयोग आणि राष्ट्रभक्तीचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र केला. त्यांच्या प्रत्येक कृतीला साहजिकच विशेष वजन होते. केवळ या कृतीने त्यांनी नुसता महाराष्ट्रच नव्हे तर सारा भारत देश आपलासा केला. म्हणूनच ते जनमानसातील लोकमान्य झाले. राष्ट्रकार्यासाठी भारतभर रेल्वेने फिरताना प्रत्येक रेल्वे स्थानकावर त्यांचे जनतेकडून उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत होई, त्यातच सारे आले. या त्यांच्या समाजप्रेमाची दाखल इंग्रजांना ही घ्यावी लागली.
शालेय जीवनातील त्यांचा शेंगदाण्याच्या साली टाकण्याचा तसा साधाच प्रसंग. गुरुजींना त्यांनी दिलेल्या बाणेदार उत्तरातून त्यांच्या मनातील अन्यायाची मनस्वी चीड प्रकट होते. शालांत परीक्षेत त्यांना अपयश आले तरी अजिबात खचून न जाता त्यांनी केलेले बलसंवर्धन पुढे राष्ट्रकार्यात त्यांना मोलाचे ठरले. परकीय सत्तेशी दोन हात करताना एकी, भक्तीसह बलसंपन्नतेचा आदर्श सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी जनतेस घालून दिला होता. अगदी त्याच मार्गाने लोकमान्यांनी समर्थांचा आदर्श आणि विचार समाजापुढे ठेवला. सतराव्या शतकाची जणू ती पुनरावृत्तीच होती.
यावनी काळाप्रमाणे इंग्रजी काळ फारच वाईट होता. सर्वच बाबतीत भारतीय जनता चांगलीच इंग्रजाळलेली होती. इंग्रजांची सेवाचाकरी करण्यातच धन्यता मानत होती. त्यांची चाकरी करीत असतानाच तेच जणु रयतेचे मायबाप समजले जात. त्याचा गैरफायदा इंग्रज सत्ताधीशांनी घेतला. सेवेत सर्व ठिकाणी भारतीय जनतेला द्वितीय स्थानीच ठेवले जात असे. वास्तविक आपण पात्र असूनदेखील सेवेच्या उच्च स्थानी यावे, असे कधी भारतीयांना वाटतही नव्हते. ही मानसिकताच टिळकांना बदलायची होती. येथे परत इतिहासाची पुनरावृत्ती घडली. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शहाजीराजेंना नाशिकला सतराव्या शतकात दिलेला मौलिक सल्ला महत्त्वाचा ठरतो. आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची असेल तर आपण पारतंत्र्यात राहून कधीच स्वराज्याची स्वप्नेदेखील पाहू शकत नाही. तेव्हा स्वराज्यासाठी म्हणजेच सुराज्यासाठी आपण स्वतंत्र असणे केव्हाही महत्त्वाचे आहे. स्वराज्य आणि सुराज्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
स्वामी समर्थांचा आदर्श टिळकांनी शिरोधार्य मानून आपल्या कार्यास एकी, बलसंवर्धन आणि भक्ती या विचारांतून स्वतःची चतुःसूत्री बनविली १] जनतेत स्वराज्याची जागृती, २] राष्ट्रीय शिक्षण, ३] स्वदेशीचा पुरस्कार आणि ४] विदेशीचा बहिशकार. स्वराज्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण सक्षमता समाजात पूर्णपणे उतरविण्यासाठी समाज जागरूक आणि शिक्षित होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी विद्याप्रसाराचे महान कार्य हाती घेतले. त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज या शिक्षण संस्था स्थापिल्या. घराघरात स्वराज्याचा विचार मनापासून रुजविण्यासाठी पुण्यातील गायकवाड वाड्यात केसरी नावाचे वर्तमानपत्र काढून सर्वांना अत्यंत माफक दरात समाजाला गावोगावीदेखील ते उपलब्ध केले. टिळकांचा करारी आवाज केसरीच्या अग्रलेखातून समाजाच्या डोळ्यांत राष्ट्रीय कार्याचे झणझणीत अंजन टाकीत असे. तो जणू प्रखर स्वराज्याचा अंगारच होता.
लोकमान्य टिळक जहाल पक्षाचे आणि विचारांचे असल्याने आधी वैचारिक नंतर सामाजिक कृती यावर त्यांचा विशेष भर होता. त्यांच्या जहाल विचारांचा अंगार सर्वत्र फुलत असे. गोपाळ गणेश आगरकर म्हणजे स्वातंत्र्यक्रांतीतील त्यांचे खरे मित्र. कित्येक रात्री या दोघांनी सिंहगडावर क्रांतीच्या खूप गप्पा मारल्या. आगरकरांनीदेखील शिक्षण संस्था काढली होती. फक्त ते पडले मवाळ विचाराचे. प्रथम सामाजिक क्रांती, नंतर वैचारिक क्रांती अशा मूलभूत विषयांनी त्यांच्यात मोठी वैचारिक दरी पडू लागली.
दरम्यान, पुण्यात आलेली महाविनाशक प्लेगची साथ, त्यामुळे ब्रिटिश पोलिसांचा घराघरात अतिरेकी वावर, त्यामुळे पावित्र्याचा भंग इत्यादी कारणांनी टिळकांची या पोलिसांच्या कृतीस फार मोठा विरोध केला होता. त्यात रँडचा खून इत्यादी गोष्टी टिळकांनी सर्व स्वातंत्र्यसैनिक मंडळींना सदैव जवळ घेऊन वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन आणि मदतदेखील केली. त्यामागे त्यांचे महत्त्वाचे सूत्र होते ते म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय.

एकदा संत गजानन महाराजांना सभेसाठी बोलविले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे सभागृहाच्या मंचावर उपस्थित होते. त्याच वेळी गजानन महाराज उपस्थित होते. भाकरीचा प्रसाद त्यांना देत असताना, तुरुंगात फार मोठे आध्यात्मिक कार्य तुमच्याकडून होणार आहे! असा आशीर्वाददेखील दिला. मंडाले येथील कारागृहात त्यांचे वास्तव्य कधीच वाया गेले नाही. गीतारहस्यासारख्या मौल्यवान आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती होऊ शकली.

कोणाही क्रांतिकारी विचारवंताला सर्वांना त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. सर्वांना त्यांचे सर्वंकष सहकार्य होते. अगदी वेळात वेळ काढूनदेखील समोरच्या व्यक्तीचे पूर्ण शंकासमाधान करून स्वातंत्र्याची ठिणगी सतत ते फुलवीत असत.

प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या होमातील दिलेल्या आहुतींचा परिणाम म्हणून लोकमान्यांच्या निधनानंतर बरोबर २७ वर्षांनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत पारतंत्र्याच्या जोखडातून अखेर मुक्त झाला. साहजिकच स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे हौतात्म्य केव्हाही भारतीय विसरणार नाही,. म्हणूनच म्हटले जाते ‘’तयांचे व्यर्थ न हो बलिदान …..’’.
एक गोष्ट मात्र मनात घर सदैव करून राहते, ती म्हणजे बळवंतरावांचे बळावलेल्या मधुमेहाने अकाली झालेले निधन आणि त्यांनी घेतलेला अखेरचा श्वास. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी असंख्य भक्तांच्या ठिकठिकाणाहून झुंडीच्या झुंडी आल्या होत्या. कारण ते नुसतेच लोकनेते क्रांतिकारक, आध्यात्मिक गुरू नव्हते तर साक्षात अवतारी पुरुष असल्याचा प्रत्यय सर्वांना आल्याशिवाय राहत नाही.
बळवंतराव यांना सविनय सादर प्रणाम.

  • रामकृष्ण विनायक अभ्यंकर,
  • २/४६ भक्तियोग सोसा.,
  • परांजपे नगर, वझिरा नाका,
  • बोरिवली (प.), मुंबई ४०००९१
  • (संपर्क : ९८१९८४४७१०)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply