चिपळूण : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल आणि सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती जागवणारा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिरवणुकीने पोस्टात जाऊन जवानांसाठी राख्या रवाना केल्या. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)
‘माझा देश मी देशाचा’ या संकल्पनेतून ‘एक राखी देशासाठी’ या उपक्रमांतर्गत सहाशे विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. युनायटेड इंग्लिश स्कूल ते चिपळूण मुख्य पोस्ट ऑफिस असा या मिरवणुकीचा मार्ग होता. विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांसाठी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या चिपळूण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देशभरातील जवानांपर्यंत पाठवण्यात आल्या. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
या उपक्रमाची सुरुवात युनायटेड इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांच्या हस्ते सरस्वती देवी व मातृपूजनाने झाली. दहावीतील विद्यार्थी रुद्र बांडागळे याने मिरवणूक सुरू होण्यापूर्वी गाऱ्हाणे घातले. शाळेतील आठवी-नववीतील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन, देशभक्तिपर घोषणा देत, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा जयघोषांसह मिरवणुकीचे नेतृत्व केले. संपूर्ण मार्गभर विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची उधळण केली.
युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ विद्यार्थ्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वडिलांसाठी खास राख्या तयार करून त्या त्यांच्या युनिटच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या. ही राखी केवळ बंधुभाव दर्शवणारी नसून सैन्यातील शूर वीरांना मनोबल देणारी ठरली.
पोस्ट ऑफिस परिसरात पोहोचल्यावर युनायटेड इंग्लिश स्कूल आणि गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या महिला शिक्षकांनी पोस्टातील अधिकाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. यावेळी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, नगरपालिकेचेच मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, नायब तहसीलदार श्री. मोरे, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भारतीय जवानांच्या राख्यांची पाकिटे पोस्टमास्तर श्रीमती जोशी व अधिकारी श्री. कदम यांच्याकडे औपचारिकरीत्या सुपूर्द करण्यात आली.
यावेळी युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी उपक्रमामागील प्रेरणा उलगडून सांगितली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. राखी हा केवळ बंधाचा उत्सव नसून, तो सुरक्षा व सन्मानाचे प्रतीक आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनात उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, प्रेमजीभाई आसर स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नाईक, शिशुविहारच्या सौ. रानडे, गद्रे इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती यशोदे, प्रायमरी विभागप्रमुख सौ. गोरिवले, प्री-प्रायमरीच्या सौ. पोटसुरे, तसेच शिक्षक संदीप मुंडेकर, सर्व शिक्षक, पालक प्रतिनिधींचीही उपस्थिती लक्षणीय ठरली.
प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध मिरवणुकीचे विशेष कौतुक केले. परशुराम एज्युकेशन सोसायटीने घेतलेला हा उपक्रम शिक्षणासोबत मूल्यशिक्षण व राष्ट्रप्रेम शिकवणारा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाची सांगता सौ. वैशाली चितळे यांनी मुलांबरोबर महाराष्ट्र राज्य गीत गाऊन केली. या अभिनव उपक्रमामुळे चिपळूणच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी भारतीय सेनेच्या सैनिकांपर्यंत राखीच्या माध्यमातून प्रेम, सन्मान आणि सुरक्षा यांचा संदेश पोहोचवला.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




