श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी योग; गणपतीपुळ्यात विशेष बैठकीत झाले यात्रोत्सवाचे नियोजन

गणपतीपुळे : येत्या १२ ऑगस्ट २०२५ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी असून, श्रावणात हा योग आल्याने विशेष महत्त्वाचा आहे. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यात या दिवशी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव होणार आहे. त्याच्या नियोजनासाठीची बैठक सात ऑगस्टला सायंकाळी गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात झाली. त्या वेळी रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. यात्रोत्सवाचे चोख नियोजन करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या निमित्ताने गणपतीपुळ्यात येणाऱ्या विविध ठिकाणच्या भाविकांना दर्शनाची आणि अन्य सर्व प्रकारची व्यवस्था अतिशय सुरळीतरीत्या उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान समिती, पोलीस यंत्रणा, महावितरण, आरोग्य विभाग, आरटीओ, एसटी महामंडळ, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग आणि अन्य सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व यंत्रणांनी आपापली सर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण करावीत. येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने चोख नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या अंगारकी चतुर्थी उत्सवादिवशी स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी खुले होणार आहे. प्रारंभी गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजित विनायक घनवटकर यांच्या हस्ते श्रींची पूजा अर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री साडेदहापर्यंत एकूण १८ तास भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वेळी ५० ते ६० हजार भाविक श्रींच्या दर्शनासाठी येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा अंगारकीचा योग पवित्र श्रावण महिन्यात जुळून आल्याने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून भाविकांची मोठी गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी अंगारकीला सुमारे २५ हजार भाविक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र ५० हजारांहून अधिक भाविक आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या अंगारकीला भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर आणि गणपतीपुळे परिसरात परिसरात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत नेटके नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था गणपतीपुळे येथील सागर दर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल आणि गणपतीपुळे खारभूमी मैदान या भागात करण्यात येणार आहे. गणपतीपुळे परिसरातील सर्व खड्डे बुजवण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. समुद्र सध्या खवळलेला असून, ही सध्याची धोक्याची स्थिती लक्षात घेऊन गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि सर्व यंत्रणांच्या वतीने परिसरात माहिती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारी विशेष गस्त घालण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि अन्य यंत्रणा सज्ज ठेवाव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गणपतीपुळे ग्रामपंचायतीने परिसरातील वीजपुरवठा, पाणी व्यवस्था, पार्किंग व्यवस्था व अन्य सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा भाविकांना तत्परतेने मिळण्याच्या दृष्टीने कटाक्षाने लक्ष घालावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. या नियोजन बैठकीला तहसीलदार राजाराम म्हात्रे, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर, पंच अमित मेहेंदळे, विद्याधर शेंडे, गणपतीपुळे गावाच्या सरपंच कल्पना पक्ये, जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजित विनायक घनवटकर, ग्रामपंचायत सदस्य राज देवरुखकर, ग्रामसेवक प्रवीण चौधरी, गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी, राहुल घोरपडे, भागवत, मालगुंड तलाठी कार्यालयाचे मंडल अधिकारी अरुण जाधव, तलाठी वीर, कोतवाल सुशील दुर्गवळी, मालगुंड आरोग्य विभागाचे नागवेकर आदी मान्यवर आणि विविध खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत गणपतीपुळे देवस्थानचे मुख्य लिपिक महेश भिडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply