देवरूख : वांझोळे (ता. संगमेश्वर) येथील कलाशिक्षक सूरज दत्ताराम धावडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या रांगोळीची नोंद जगातील सर्वांत मोठी रांगोळी म्हणून झाल्याचे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १२ ऑगस्ट २०२५ रोजी घोषित केले आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रोहा (जि. रायगड) येथे ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली होती. शिवराज्याभिषेक सोहळ्याची १,२५,००० चौरस मीटर आकाराची रांगोळी साकारण्यासाठी १०० कलाकारांनी एकत्र येऊन ५००० किलो रांगोळी वापरत ७० तासांमध्ये ही रांगोळी पूर्ण केली होती.
वांझोळे गावचे माजी सरपंच व रिक्षा व्यावसायिक दत्ताराम धावडे यांचे सूरज हे सुपुत्र आहेत. सूरज यांचे प्राथमिक शिक्षण वांझोळे जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शिक्षण शिवाजी माध्यमिक विद्यालय आणि पुढे आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातून २००९ मध्ये बारावी वाणिज्य शाखेतून झाले. २०१४ मध्ये पुणे येथील सुप्रसिद्ध अभिनव कला महाविद्यालयातून गव्हर्न्मेंट ड्रॉईंग डिप्लोमा इन ड्रॉईंग अँड पेंटिंग (जी. डी. आर्ट) उत्तम गुणांनी पूर्ण केला. त्यानंतर कोल्हापूरच्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून ६ वर्षे काम केले. पुण्यात दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये ते गेली २ वर्षे कलाशिक्षक आहेत.
सूरज यांच्या चित्रांची महाराष्ट्र कला प्रदर्शनास सलग दोन वर्षे विद्यार्थी गटातून निवड झाली होती. कॅमल आर्ट फाउंडेशनच्या कला प्रदर्शनासाठी २ वेळा निवड झाली होती, यामध्ये ते एकदा विद्यार्थी गटातून तर दुसऱ्या वेळी व्यावसायिक गटातून सहभागी झाले होते. पुण्यातील व्ही. व्ही. ओक राष्ट्रीय कला प्रदर्शनात सलग २ वर्षे निवड झाली होती. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय कलाप्रदर्शनातील व्यावसायिक गटातून २ वेळा निवड झाली होती. तसेच दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अखिल भारतीय कला प्रदर्शनातील व्यावसायिक गटात निवड झाली होती.
श्री. धावडे यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. ते असे – सावर्डे कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचा सन्मान, कलावर्त राष्ट्रीय स्पर्धा, उज्जैन(मध्य प्रदेश) येथे व्ही. एम. वाकणकर सुवर्णसन्मान (२०११). भारती कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनातील सन २०१३ चा प्रथम क्रमांक, कला महाविद्यालय, सावर्डे यांनी २०१४ मध्ये आयोजित केलेल्या अखिल भारतीय कला स्पर्धेत बेस्ट पेंटिंग अॅवॉर्ड, चित्रलीलानिकेतन कला महाविद्यालय, पुणे यांच्या कलाविश्व चित्रकला स्पर्धेत सन २०१४ मध्ये द्वितीय क्रमांक, सन २०१६चा प्रथम क्रमांक.
अखिल भारतीय कला प्रदर्शन (नाशिक) येथे २०१३ मध्ये करिता सूरज यांच्या चित्रांची निवड झाली होती. न्यू आर्ट गॅलरी, पुणे भारती विद्यापीठ वार्षिक कला प्रदर्शनात (२०१३) त्यांच्या विविध शैलीतील चित्रांचा सहभाग होता. नेहरू सेंटर, मुंबई यांच्या चातक शो २०१२ मध्ये, तसेच ३६व्या जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई आयोजित मान्सून शो २०१४ मध्ये सहभाग घेऊन रसिक प्रेक्षकांची शाबासकी प्राप्त केली होती.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, डॉ. सदानंद आग्रे, परिसरातील मित्रमंडळी आणि वांझोळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. धनंजय दळवी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. केदारलिंग ग्रामस्थ मंडळाचे संस्थाध्यक्ष अनिल पंदेरे, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक दीपक लिंगायत, मुख्याध्यापक संजय कोरे आणि शिक्षकांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

