शेवग्याच्या पानांचे लाडू, अळूच्या देठाचे बोंबिल फ्राय, रानभाजी पराठा-कढीपत्ता चटणी हे पदार्थ ठरले जिल्हास्तरीय रानभाज्या पाककला स्पर्धेत विजेते

रत्नागिरी : जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवात घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी रानभाज्यांच्या अनेक कल्पक पाककृती सादर केल्या होत्या. पूजा सुरेश भुवड यांना रानभाजी पराठा-कढीपत्ता चटणी या पाककृतीसाठी पहिला क्रमांक मिळाला. अनन्या अक्षय खानविलकर यांनी केलेली अळूच्या देठाचे बोंबिल फ्राय (प्युअर व्हेज) ही पाककृती दुसऱ्या क्रमांकासाठी निवडली गेली. शर्मिली विनय गांगण यांनी केलेले शेवग्याच्या पानांचे लाडू तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. (स्पर्धेतील सर्व पाककृतींचा आणि पारितोषिक वितरणाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प), रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव आणि पाककला स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील अंबर हॉलमध्ये घेण्यात आले. त्याचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, रोटरीचे प्रमोद कुलकर्णी, ॲड. स्वप्नील साळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत, पणनचे उपसरव्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, राहुल पंडित, बाबू म्हाप, बंड्या साळवी आदी उपस्थित होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

‘ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन घेतल्यास रानभाज्यांच्या अधिकाधिक प्रकारांची माहिती मिळेल. रानभाज्यांचे महत्त्व आणि व्यवसाय याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. रानभाज्यांच्या मार्केटिंगची गरज आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. केवळ ३०-३५ रानभाज्या मांडून प्रदर्शन करणे पुरेसे नाही. शेकडो प्रकारच्या रानभाज्या जंगलात उपलब्ध असतात. पुढच्या वर्षी राज्यातला सर्वांत मोठा रानभाज्या महोत्सव रत्नागिरीत भरवण्याचे उद्दिष्ट ठेवावे,’ असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले.
या ठिकाणी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तसेच, पाककला स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या पदार्थांचेही प्रदर्शन भरवण्यात आले होते. रानभाज्यांपासून पराठा, थालीपीठ, वड्यांपासून लॉलिपॉप, बिर्याणी, बर्गर, पिझ्झा, मोमोज असे विविध प्रकारचे पदार्थ स्पर्धकांनी सादर केले होते. मनीषा साने-टाकळकर आणि ऋता पंडित यांनी पाककला स्पर्धेचे परीक्षण केले. ‘रानभाज्यांची ओळख’ या विषयावर डॉ. किरण मालशे यांचे, तर ‘रानभाज्यांचे आहारातील महत्त्व’ या विषयावर डॉ. स्वप्नजा मोहिते यांचे व्याख्यान या वेळी झाले. (पाककला स्पर्धेतील सर्व पदार्थ, बक्षीस वितरण आणि तज्ज्ञांची व्याख्याने सोबतच्या व्हिडिओत पाहता येतील.)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply