Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय नव्या युगाचे बहुविध ज्ञानकेंद्र ठरेल : दीपक पटवर्धन

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय नव्या युगाचे बहुविध ज्ञानकेंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. वाचनालयाच्या नव्या वास्तूमध्ये दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्रंथपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या १ डिसेंबर २०२४ रोजी नूतन बांधकाम करण्यासाठी वाचनालयाची ग्रंथसंपदा वाचनालयाबाहेर नेण्यात आली होती. अत्यंत वेगाने नवीन बांधकाम करण्यात आले. फक्त ९ महिन्यांत ४००० चौरस फुटाचे बांधकाम पूर्ण करत आता तळमजला वापरासाठी सज्ज होताच आज वाचनालयातील १ लाख पुस्तकांपैकी ७२ हजार पुस्तके वाचनालयात पुन्हा स्थानापन्न झाली.

अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले, २०० वर्षांच्या उंबरठ्यावर हे वाचनालय उभे आहे. अशा वेळी नव्या शतकाची सुरुवात करताना ३०० वर्षांच्या मार्गक्रमणाचा मार्ग सुकर व्हावा या दृष्टीने योजना करत नवी भव्य आधुनिक वास्तू उभारण्यात येत आहे. रत्नागिरी नगरीचे वैभव, इतिहासाचे साक्षीदार समृद्ध ग्रंथसंपदेचे धनी असलेले हे ग्रंथमंदिर अद्ययावत पद्धतीने उभे करण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे जाताना ग्रंथसंपदा वाचनालयात स्थानापन्न झाल्याने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

जुन्या इमारतीला निरोप देतानाच वर्षभरात वाचनालय नव्या इमारतीत सुरू करण्याचा संकल्प जाहीर केला होता. केवळ ९ महिन्यांत हा शब्द खरा ठरत आहे. येत्या १२ ऑक्टोबर रोजी वाचनालयाचा तळमजला पूर्ण सज्ज होऊन नियमित वाचनालय नव्या वास्तूत कामकाज चालू करेल. प्रशस्त कार्यालय. डिजिटल रूम, उत्तम पुस्तक मांडणी वाचकांना बसून पुस्तके हाताळता येतील अशी व्यवस्था, भरपूर प्रकाश आणि हवेशीर वातावरण वाचकाला नक्कीच वेगळी अनुभूती देईल, असा विश्वास अध्यक्षांनी व्यक्त केला.

वाचनालयाच्या उभारणीसाठी प्रयत्नपूर्वक दोन कोटींचा निधी उभा केला आहे. कोणत्याही सार्वजनिक संस्थेला अभिमान वाटावा अशा वेगाने आणि उत्तम प्रतीची भव्य वास्तू निर्माण करता आली याचे समाधान लाखमोलाचे असल्याचे श्री. पटवर्धन यांनी आवर्जून नमूद केले. आजच्या ग्रंथ पूजनासाठी दीपक गद्रे, रूपेश साळवी, सुहास विद्वांस, सौ. प्रभुदेसाई, श्रीमती दामले, सौ. आठवले, उमेश कुलकर्णी, अर्जुन कुलकर्णी, श्री. लेले सर, वैभव पटवर्धन, सौ. अंकिता पटवर्धन, व्यवस्थापक मंडळ सदस्य व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version