Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कॅन्सरप्रतिबंधक एचपीव्ही लसीकरणाचा महाराष्ट्रात सर्वप्रथम रत्नागिरीत प्रारंभ

Advertisements

रत्नागिरी : ह्युमन पॅपिलोमा व्हायरस अर्थात एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरणाचा आज (चार ऑक्टोबर) रत्नागिरीत प्रारंभ झाला. हे लसीकरण करणारा रत्नागिरी हा राज्यातला पहिला जिल्हा आहे, असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या वेळी सांगितलं. महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा नवीन संसर्ग रोखणं, तसंच या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करणं हे या लसीकरणाचं उद्दिष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊ ते १४ वर्षं वयोगटातल्या ५० हजार मुलींना ही लस देण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी या वेळी दिली. कर्करोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून जिल्ह्याच्या प्रशासनाने लसीकरणाची जबाबदारी स्वीकारली हे महत्त्वाचं आहे. हा लसीकरण कार्यक्रम केवळ जिल्ह्यालाच नव्हे, तर राज्याच्या आरोग्य क्षेत्राला दिशा देणारा आहे, असं प्रतिपादन सामंत यांनी केलं. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी या लसीबाबत सविस्तर माहिती दिली. एचपीव्ही अर्थात ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा २००हून अधिक विषाणूंचा समूह आहे. त्यापैकी काही विषाणू आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. एचपीव्हीच्या काही प्रकारांमुळे गर्भाशयमुखाचा, घशाचा, तसंच मलाशयाचा कर्करोग होऊ शकतो. एचपीव्हीशी संबंधित विकार टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींकरिता एचपीव्ही प्रतिबंधक लशीची शिफारस केली जाते. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं अनेक क्निनिकल चाचण्यांद्वारे स्पष्ट झालं आहे. ही लस संसर्गापूर्वी दिली गेली तर बचाव करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version