रत्नागिरीतील नऊ गावे आदर्श म्हणून विकसित करणार : उदय सामंत

रत्नागिरी : ‘रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातल्या एका गावावर लक्ष केंद्रित करून ही नऊ गावं आदर्श मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी आणि निधी दिला जाईल,’ असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (१७ सप्टेंबर) दिलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्ह्यातला प्रारंभ त्यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातल्या मिरजोळे गावात झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, मिरजोळे गावाचे सरपंच रत्नदीप पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. हे अभियान पुढे नेण्यासाठी आणि गावं स्वायत्त करण्यासाठी गरज पडल्यास कटू निर्णयही घ्यावे लागतील, असंही पालकमंत्री या वेळी म्हणाले.

महसूल सेवा पंधरवड्याची सुरुवात
‘लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने वर्षभर ‘नमो सेवा वर्ष’ साजरं करून महसूल विभागाने राज्यासमोर वेगळा आदर्श निर्माण करावा,’ अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी महसूल सेवा पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी प्रतारणा होणार नाही आणि त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचं उद्घाटन
‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या अभियानाचा प्रारंभ आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा शासकीय रुग्णालयात झाला. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ‘हे अभियान केवळ १५ दिवसांपुरतं न राबवता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर राबवावं,’ अशी सूचना त्यांनी केली. ‘आरोग्य विभाग आणि शासकीय रुग्णासयाने एकत्र काम करून या मोहिमेअंतर्गत महिलांना लाभ देतानाच त्याबाबत गावागावातून जनजागृतीही करावी. कुपोषित बालकांची संख्या शून्यावर आणावी आणि कुपोषित माता आढळल्यास त्यांना सशक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असं त्यांनी सांगितलं.
कॅन्सरपासून महिलांचं संरक्षण करणारी एचपीव्ही लस जिल्ह्यातल्या नऊ ते १४ वर्षं वयोगटातल्या ५० हजार मुलींना दिली जाणार असून, त्यासाठी आश्यक तेवढा निधी दिला जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply