शिवकालीन रणरागिणींच्या स्मृती जागवणारा प्रेरणादायी सोहळा उत्साहात

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रणरागिणींचा पराक्रम आणि स्त्रीशक्तीची परंपरा नव्या पिढीपुढे उभी करण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात वार्षिक सोहळा उत्साहात पार पडला.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना आनंद दिला. इतिहास अभ्यासक-लेखक प्रवीण भोसले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिक्षणाचा उपयोग केवळ प्रमाणपत्रापुरता न राहता दैनंदिन आयुष्यात आणि आवडीच्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवण्यासाठी करावा. शिवरायांचे आठवावे रूप, आठवावा प्रताप — असे म्हणताना इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या रणरागिणी डोळ्यांसमोर येतात. मातोश्री जिजाबाई, महाराणी येसूबाई, ताराराणी, राणी यल्लम्मा, पुण्यश्लोक अहिल्याबाई, वीरांगना रायबागन या स्त्रिया भावनांवर विजय मिळवत प्रत्येक आव्हानाला सामोरे जात होत्या. त्या स्वराज्यसेवक वीरांचा आधार होत्या आणि अप्रत्यक्षपणे स्वराज्यासाठी लढत होत्या. आजही स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. तुम्हीही त्यांचा आदर्श घ्यावा.

विशेष पाहुणे एनएसजी कमांडो नरेश पवार यांनी आपल्या लष्करी अनुभवांची माहिती दिली. ते म्हणाले, पठाणकोट हल्ला, जम्मू-काश्मीरमधील कारवाया, पुंछ येथे बॉर्डरपार ऑपरेशन अशी सलग तीन वर्षे पाकिस्तानविरोधात कार्य करताना आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो. नुकतेच यशस्वी झालेले सिंदूर ऑपरेशन जाहीर करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन धाडसी महिला होत्या. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग सैन्यदलासाठीही करता येतो, त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत समाजकार्याचा पाया ठरावेत, या ध्येयाने कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा सुभेदार वीर तानाजी मालुसरे सन्मान मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष आणि इतिहास अभ्यासक रवींद्र मालुसरे यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, स्वराज्य हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सत्यात उतरवले, संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. या यज्ञात असंख्य मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र धर्म काय असतो हे जगाला कळाले. या इतिहासाचा विसर मराठी माणसाला पडता कामा नये.

संस्थेचे प्रमुख डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी संस्थेचे योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, बारावीनंतर मुलींनी स्वावलंबी व्हावे, ही संकल्पना घेऊन मी डॉ. गायकवाड इन्स्टिट्यूट सुरू केली. आज ती पॅरामेडिकल क्षेत्रात देशभरात महत्त्वाचे स्थान मिळवून आहे. कठोर शिस्तीमुळे अनेक मुली माझ्यावर बापासारखा विश्वास ठेवतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य देशातील विविध भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनलची स्थापना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय शिवकालीन रणरागिणी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. डॉ. अनुज अविनाश केसरकर, मुंबई (प्रथम – रोख रुपये ५,०००), प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे, ठाणे (द्वितीय – रुपये ३,०००), सुमिता अभिषेक पवार, मुंबई (तृतीय – रुपये २,०००), स्नेहल गोविंद चव्हाण, रत्नागिरी आणि हिमांशू विजय शुक्ल, जळगाव (उत्तेजनार्थ – प्रत्येकी रुपये १,०००) यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर, युक्ता गोठणकर आणि आरती लोखंडे यांनी केले. आर्णा सुर्वे, साक्षी निर्मल, गौरव गायकवाड, समिक्षा बिळीगुदरी आणि साहिल धाकतोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply