जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा तिसरा भाग… मधुमेह कोणाला होऊ शकतो, मधुमेहाचे प्रकार आणि मधुमेहामुळे होणारे विकार याबद्दलची माहिती आपण या लेखमालेच्या दुसऱ्या भागात घेतली. आजच्या या तिसऱ्या भागात आपण आणखी काही माहिती घेऊ या.
मधुमेहाच्या चिकित्सेमध्ये म्हणजेच उपचारांमध्ये आहार, व्यायाम, औषधे या गोष्टींचा समावेश होतो. त्यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. मधुमेह असणाऱ्यांनी नेमका कसा आणि काय आहार घ्यावा, याविषयी खूप गैरसमजुती आणि गोंधळ आहे. आहार समतोल असणे आवश्यक आहे. शरीराचे वजन उंचीच्या अनुषंगाने असावे आणि त्यानुसार आहार असावा. दिवसभरात सहा ते सातवेळा थोडे थोडे खावे. त्यामुळे (लो शुगर) रक्तातील साखर कमी होत नाही आणि खूप भूकही लागत नाही. आहारात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ५० ते ६० टक्के असावेत, स्निग्ध पदार्थ १० ते २० टक्के असावेत आणि प्रोटीन्स (प्रथिने) १० ते २० टक्के असावीत. आहार योग्य आणि योग्य प्रमाणात घेतला. तसेच व्यायाम योग्य प्रकारे व नियमित केला, तर रक्तशर्करा चांगल्या प्रकारे नियंत्रित (शुगर कंट्रोल) राहते आणि गोळ्या कमी लागतात.
व्यायाम
मधुमेही रुग्णांनी नियमित व्यायाम केला, तर त्यांची शुगर लेव्हल कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर व्यायामामुळे वजन कमी होते, शरीराची लवचिकता वाढते. एचडीएल कोलेस्टेरॉल म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल वाढते. शक्यतो कुठलाही व्यायाम करण्याच्या एक तास आधी हलका आहार घ्यावा. त्यामुळे लो शुगर होणार नाही. शक्यतो हलकेफुलके व्यायाम करावेत. चालणे हा सर्वांत सोपा व सहज होणारा व्यायाम आहे. आपल्याला जड व्यायाम करायचे असतील तर आपले डॉक्टर किंवा कार्डिऑलॉजिस्ट यांचा सल्ला घ्यावा. व्यायामाचा अतिरेक झाल्यास चक्कर येणे, पडणे, फ्रॅक्चर होणे किंवा हार्ट अॅटॅकसारखे घातक परिणाम होऊ शकतात.
औषधोपचार
मधुमेहाच्या बाबतीत आपण जेव्हा औषधोपचार म्हणतो, तेव्हा त्यात गोळ्या व इन्सुलिन हे दोन्ही घटक आले. या भागात आपण गोळ्यांबद्दल माहिती घेऊ. जुनी संकल्पना अशी होती, की मधुमेही रुग्णांना पहिल्यांदा गोळ्या द्यायला हव्यात. गोळ्यांमध्ये विविध प्रकार असतात. काही गोळ्यांमुळे वजन वाढते, तर काही गोळ्यांमुळे वजन कमी होते. काही गोळ्यांमुळे वजनावर काहीही फरक पडत नाही. गरोदरपणात फक्त मेटफॉर्मिन (Metformin) ही गोळी चालते. तसेच टाइप वन डायबेटीसमध्ये शक्यतो फक्त इन्सुलिन घ्यावे.
गोळ्यांच्या बाबतीत पहिला गैरसमज असा आहे, की गोळ्या मूत्रपिंड (किडनी) किंवा यकृत (लिव्हर) खराब करतात. गोळ्या आपल्याला मदत करायला असतात; पण किडनी किंवा लिव्हरला काही कारणास्तव दुखापत झाली असेल, तर हे अवयव आणखी खराब होऊ शकतात. शक्यतो खूप पेनकिलर्स घेतली गेली असतील, वय खूप जास्त असेल किंवा अनकंट्रोल्ड शुगरमुळे (अनियंत्रित रक्तशर्करा) किडनी किंवा लिव्हर सडायला लागले असेल, तर गोळ्या दुखापत वाढवू शकतात.
आजच्या काळात नवीन गोळ्या आल्या आहेत, त्या फक्त शुगर कमी करत नाहीत, तर वजनही कमी करतात. तसेच रक्तदाब कमी करतात आणि हृदयालाही संरक्षण देतात.
दीर्घ काळ मधुमेह असल्यास किंवा स्वादुपिंड निकामी झाल्यास एक वेळ अशी येते, की भरपूर गोळ्या घेतल्यावरही शुगर नियंत्रणात येत नाही. त्याला टॅब्लेट फेल्युअर (Tablet Failure) असे म्हटले जाते. तेव्हा मग इन्सुलिनची गरज भासते.

– डॉ. आशिष सरवटे, ठाणे येथील डायबेटॉलॉजिस्ट

