दापोली : लाडघर (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील दत्त सांस्कृतिक मंडळातर्फे दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या समुद्राच्या वाळूमधील सायकल आणि धावण्याच्या शर्यती रविवारी, सात डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता लाडघर समुद्रकिनारा येथे होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता बैलगाडी स्पर्धा होणार आहेत.
लाडघर दत्तमंदिरात साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्त सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दीपक बोरकर, उपाध्यक्ष नीलेश मोरे आणि सचिव राजन सनकुळकर यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, की १९६५पासून या मंडळातर्फे सायकल आणि धावण्याच्या शर्यती आयोजित केल्या जात आहेत. हे स्पर्धेचे ५९वे वर्ष आहे. यातील सायकल शर्यतीचे अंतर दोन किलोमीटर आहे. परंतु लाडघर समुद्रकिनाऱ्यावर वाळूमध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे किंवा धावणे आव्हानात्मक असते. कोरड्या वाळूमध्ये सायकल रुतते किंवा जास्त वेगाने पळतही नाही. त्यामुळे अटीतटीची होणारी ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यामध्ये भाग घेण्यासाठी भरपूर गर्दी होते.
सायकल आणि धावण्याच्या स्पर्धा खुल्या गटात होतील. गीअर, नॉनगीअर अशी कोणतीही सायकल वापरता येईल. यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नसून, आगाऊ नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात येईल. अधिक माहितीसाठी अभिनय कर्देकर (७७६७०७५३५२) किंवा वृषाल सुर्वे (७३५०४८९२८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे. सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा. मैदानी खेळ खेळावेत. पर्यावरण जपावे आणि आपले आरोग्य तंदुरुस्त बनवावे, असे आवाहन दत्त सांस्कृतिक मंडळाने केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

