नवी दिल्ली : नैर्ऋत्य मान्सून आज, चार जून २०२६ रोजी केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. आज मान्सूनने केरळ, लक्षद्वीप बेटे, तमिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. येत्या २-३ दिवसांत मान्सून संपूर्ण गोव्यासह दक्षिण कोकणात येण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून वेळेवर येण्याची अपेक्षा होती; मात्र अनुकूल परिस्थिती नसल्याने त्याची अपेक्षित प्रगती झाली नाही. अखेर, चार जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. केरळमध्ये येण्यास मान्सूनला यंदा त्याच्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा तीन दिवस उशीर झाला.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याच्या घटनेला एल निनो म्हणतात आणि त्यामुळे भारतीय उपखंडात मान्सूनचे प्रमाण घटते. यंदा एल निनोमुळे दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, एल निनोचा प्रभाव जूनमध्ये कमी राहण्याचा अंदाज आहे.
नैर्ऋत्य मान्सून सर्वसाधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आठ जुलैपर्यंत सारा देश व्यापतो. १७ सप्टेंबर रोजी उत्तर भारतातून मान्सून परतण्याची प्रक्रिया सुरू होते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत तो पूर्णपणे माघारी फिरतो. गेल्या वर्षी २० मे २०२५पासून रत्नागिरीसह कोकणात बहुतांश ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे प्रचंड पाऊस पडला होता. २४ मे रोजी नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. २००९ नंतर प्रथमच मान्सून एवढ्या लवकर केरळमध्ये आला होता.




