नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला केरळमध्ये!

नवी दिल्ली : मे महिन्याच्या कडक उन्हाचा उत्तरार्ध शिल्लक असताना सध्या २० मेपासून रत्नागिरीसह कोकणात बहुतांश ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे प्रचंड पाऊस पडला आहे. त्या पावसाचा जोर ओसरेपर्यंत नैर्ऋत्य मान्सूनने आगेकूच केली आहे. आज (२४ मे) नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. सर्वसाधारणपणे तो एक जूनला केरळमध्ये येतो. यंदा मात्र तो आठवडाभर आधीच तिथे आला असून, तो पुढे येण्यासाठीही वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्यास वातावरण अनुकूल आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २००९ नंतर प्रथमच मान्सून एवढ्या लवकर केरळमध्ये आला आहे.

यंदा १३ मे रोजी नैर्ऋत्य मान्सूनने बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राचा काही भाग व्यापला, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले होते. त्यापुढच्या त्या तीन-चार दिवसांत तो दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव-कोमोरीन क्षेत्र, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील आणखी काही क्षेत्रे आणि बंगालच्या उपसागराच्या मध्याकडील काही भाग व्यापून टाकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि २७ मे रोजी तो केरळात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र मान्सून २४ मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

भारतीय हवामान विभागाने एप्रिलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याच्या घटनेला एल निनो म्हणतात आणि त्यामुळे भारतीय उपखंडात मान्सूनचे प्रमाण घटते. यंदा मात्र एल निनोची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता हवामान विभागाने फेटाळून लावली आहे.

सर्वसाधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. यंदा तो २४ मे रोजीच केरळमध्ये पोहोचला. २००९नंतरचे हे मान्सूनचे केरळमधील पहिलेच लवकर झालेले आगमन ठरले. २००९ साली मान्सून २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

नैर्ऋत्य मान्सून सर्वसाधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आठ जुलैपर्यंत सारा देश व्यापतो. १७ सप्टेंबर रोजी उत्तर भारतातून मान्सून परतण्याची प्रक्रिया सुरू होते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत तो पूर्णपणे माघारी फिरतो.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply