रत्नागिरी : कर्करोगाचे निदान करणारे फिरते रुग्णालय म्हणजेच कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनचे लोकार्पण आज (२४ मे) रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या या सोहळ्याला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅनची पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी व्हॅनबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. या फिरत्या रुग्णालयाद्वारे कर्करोग तपासणीची मोहीम महिनाभर चालणार आहे. (वेळापत्रक बातमीच्या शेवटी दिले आहे.)
कर्करोग अर्थात कॅन्सर हे नाव ऐकले, तरी भीती वाटते. कर्करोग भीतिदायक असला, तरी त्याचे निदान लवकरच्या टप्प्यात झाल्यास त्यावर मात करता येऊ शकते. म्हणूनच प्रामुख्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन अर्थात फिरत्या रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. २६ मे २०२५पासून २८ जूनपर्यंत ही कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उप-जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाणार आहे. त्या व्हॅनमध्ये मुखाच्या अर्थात तोंडाच्या, स्तनाच्या आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे निदान करणाऱ्या तपासण्या केल्या जाणार आहेत. त्याचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि कर्करोगाचे लवकर निदान सुलभ करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील आणि विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत महत्त्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे कर्करोगाचे वेळेवर निदान होईल आणि अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल. ही व्हॅन सामान्य कर्करोगांच्या तपासणीसाठी सुसज्ज आहे. त्यात सुरुवातीला डिजिटल मशीन वापरून स्तनांच्या तपासण्या आणि कॉल्पोस्कोप वापरून गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या यावर लक्ष केंद्रित केले जाईल. कारण कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कोल्हापूर परिमंडळांतर्गत ही कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन मीडिऑन हेल्थकेअरकडून मिळाली आहे. या कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनसोबत रत्नागिरी जिल्ह्यातील गावभेटीकरिता दंतशल्य चिकित्सक आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका स्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ही व्हॅन ज्या तालुक्यामध्ये सेवा देईल त्या तालुक्यामधील एनसीडी स्टाफ नर्स, एनसीडी कौन्सिलर, आरोग्य सहायक, डेटा एंट्री ऑपरेटर, सपोर्ट स्टाफ आणि शिपाई अशी टीम कायम व्हॅनसोबत कार्यरत असणार आहे.
कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन जेथे कर्करोग तपासणीकरिता जाणार आहे, अशा ठिकाणी आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी यासाठी सहकार्य करावे. तसेच, या मौल्यवान संधीचा मोफत लाभ घेऊन ३० वर्षांवरच्या सर्व नागरिकांनी मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाच्या निदानाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे .

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

