Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

तिसरी, चौथी, सहावीचा ‘सेतू’ अभ्यासक्रम – नियोजनाच्या सेतूअभावी पालकांना भुर्दंड!

Advertisements

रत्नागिरी : तिसरी, चौथी आणि सहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी सुकर व्हावी यासाठी आणि जुन्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, यासाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असला, तरी या सेतू अभ्यासक्रमाची दीडशे पानांहून अधिक मोठी असलेली पुस्तके विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वतः छापून घ्यावी लागणार आहेत. नव्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्याचा सेतू म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे; मात्र योजना आणि तिची अंमलबजावणी यात समन्वय आणि नियोजनाचा सेतू नसल्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड किंवा आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान यांपैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ आणि ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३’ यांनुसार यंदा राज्यात तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. नव्या अभ्यासक्रमाची काही पुस्तके १५ जूनला (पहिल्या दिवशी) काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आली. बदललेल्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यासाठी सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून २१ दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश असून, या संदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र १० जून रोजी निर्गमित झाले आहे. (ते पत्र सोबत दिले आहे.) ही संकल्पना उत्तम असली, तरी या अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतः छापून घेणे शासनाला अपेक्षित आहे. तसा स्पष्ट उल्लेख अधिकृत पत्रात कुठेही नसल्याने यंत्रणेकडून हे अर्थातच फेटाळले जाईल; मात्र या सेतू अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची केवळ एकेकच प्रत राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांना वितरित करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या पीडीएफ फाइल्स राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्या सर्वांसाठी खुल्या आहेत, असे शाळांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

शाळांकडे असलेल्या एका प्रतीवरून सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे अर्थातच शक्य होणार नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांनी पीडीएफ फाइलवरून पुस्तके प्रिंट करून घेणे शासनाला अपेक्षित असून, या पीडीएफ फाइल्स अख्ख्या पुस्तकांच्या असल्याने साहजिकच मोठ्या आहेत. तिसरीचे पुस्तक १७२ पानांचे, तर चौथीचे पुस्तक १५६ पानांचे आहे. सहावीच्या सेतू अभ्यासक्रमाची तीन पुस्तके असून, ती ७६, ६० आणि १०० पानांची आहेत. एवढ्या पानांची पुस्तके अगदी ‘ब्लॅक अँड व्हाइट’ छापून घ्यायचे म्हटले, तरी किती खर्च येईल याचा अंदाजच बांधलेला बरा!
या पुस्तकांमध्ये कृतिपत्रिका दिलेल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास नीट समजून घ्यायचा असेल, तर पुस्तके छापून घेण्याशिवाय पर्यायच नाही. हा सेतू अभ्यासक्रम नवीनच असल्याने बाजारातही ही पुस्तके उपलब्ध नाहीत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या या पुस्तकांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ती मे २०२६मध्ये छापण्यात आली असून, तिसरी आणि चौथीच्या पुस्तकांच्या प्रत्येकी ९३,७०० प्रती, तर सहावीच्या तीन पुस्तकांच्या प्रत्येकी ४७,५१० एवढ्याच प्रती मुद्रित करण्यात आल्या आहेत. ९-१० जून रोजी या पुस्तकांच्या पीडीएफ फाइल्स संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत.
सेतू अभ्यासक्रम ही संकल्पना नक्कीच चांगली आहे; मात्र ही पुस्तके शासनाकडूनच उपलब्ध होणे अपेक्षित आहे. शासनाकडून क्रमिक पुस्तकांचे मोफत वितरण केले जाते. त्याचा मोठा गाजावाजाही केला जातो; मात्र ही सेतू अभ्यासक्रम पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतंत्रपणे छापून घेतली, तर त्यासाठी येणारा खर्च कदाचित सगळ्या पाठ्यपुस्तकांच्या एकत्रित किमतीपेक्षाही जास्त असू शकेल. कारण किरकोळ झेरॉक्स आणि प्रिंटिंगच्या दरात कुठेही एकवाक्यता नसते. एका पानाची अगदी साधी प्रिंट काढण्यासाठीही ग्रामीण भागात दहा रुपये आकारले जातात. ही पुस्तके मोठी असल्याने ती व्यवस्थित वापरता येण्यासाठी बाइंडिंगही करून घ्यावे लागणार. त्याचा वेगळा खर्च येणार. शिवाय, हा अभ्यासक्रम पहिल्या २१ दिवसांमध्ये पूर्ण करायचा असल्यामुळे हे तातडीने करून घेण्यासही काही पर्याय नाही. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांकडून इमर्जन्सी चार्जेसही आकारले जाऊ शकतात. कारण एकाच ठिकाणच्या अनेक विद्यार्थ्यांची पुस्तके एकाच ठिकाणी प्रिंटिंगसाठी आली, तर साहजिकच त्यांच्यावरही ताण येणार. ही पुस्तके रीतसर ऑफसेट प्रिंटिंग प्रेसमधून प्रिंट करून घेणेच कदाचित परवडू शकते; मात्र एकेकट्या पालकांना ते करणे शक्य होणार नाही. शाळेच्या पहिल्या दिवशी नियमित पुस्तकांसोबतच सेतू अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हायला हवी होती. एकंदरीत विचार करता, उपक्रम चांगला असला, तरी यंत्रणेचे योग्य नियोजन नसल्याने हा सेतू अभ्यासक्रम म्हणजे पालकांना विनाकारण भुर्दंड करणारा ठरणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version