पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जगात कुठेही झाले नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात : डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : ‘राज्याने शिक्षणाच्या दृष्टीने प्रगती केली आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय, याचा पालकांना अभिमान असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून माझ्यासारख्या अनेकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं. रत्नागिरी तालुक्यातल्या झरेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके, गणवेश आणि खाऊ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, प्राथमिक शिक्षणाधिकारी कासार आदी मान्यवरांसह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जगात कुठेही झालं नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात होत आहे. त्याबद्दल शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना मी धन्यवाद देतो. जिल्हा परिषदेतल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांची स्पर्धा  परीक्षेद्वारे इस्रो आणि नासाला जाण्यासाठी निवड करून पाठवणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा आहे. शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांचा आदर असला पाहिजे. शिक्षकांनीही प्रमाणिकपणे उज्ज्वल भविष्य घडवण्याचं काम केलं पाहिजे.  पुस्तकातलं ज्ञान मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने कशी संपादन करतील, यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली पाहिजे. शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर मराठी शाळेतला विद्यार्थी उत्तम इंग्रजी बोलू शकतो, अशी उदाहरणं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात मराठी भाषा होती. ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी भाषा होती. आपली मातृभाषा मराठी आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. परंतु, जगाच्या पाठीवर इंग्रजी यायला हवी. त्यासाठी शिक्षकांनी अभिनव उपक्रम सुरू करावा,’ असंही मराठी भाषामंत्री डॉ. सामंत म्हणाले. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेच्या दामले विद्यालयालाही डॉ. सामंत यांनी भेट देऊन शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply