रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिराचा प्रवेशोत्सव कार्यक्रम आज (१६ जून) उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात गुलाबपुष्प आणि चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत करण्यात आले. शाळा फुग्यांनी सजवण्यात आली होती. पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. संस्थेच्या बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरातही शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांच्यासमवेत संस्था पदाधिकारी, सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओम राम कृष्ण हरी हा जप सांगून मुख्याध्यापिका कदम यांनी बालदोस्तांचे स्वागत केले. हसत खेळत शिक्षण देण्याची ग्वाही दिली. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
संस्थाध्यक्ष साळवी म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत आगाशे विद्यामंदिराने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. आता राज्यातील सर्वोत्तम शाळा करण्याकडे प्रयत्न आहे. मातृभाषा मराठी माध्यम निवडल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करतो. इथे इंग्रजीचाही सराव करून घेतला जातो. शाळेतील शिक्षकांकडे आपुलकी असल्यानेच शाळेने मोठी प्रगती केली आहे.’ या वेळी डॉ. केळकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
शिक्षिका सौ. गीता सावंत व शिक्षक सुधीर शिंदे यांनी मुलांकडून कृतीयुक्त गाणी म्हणून घेतली. या वेळी पालकांचेही स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी मुलांना गोडाचा शिरा खाऊ म्हणून देण्यात आला. विद्यार्थी, पालकांसाठी सूचना दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत घवाळी, सतीश दळी, दादा कदम, विजय वाघमारे, श्रीराम कुष्टे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरातही शाळा प्रवेशोत्सव
भारत शिक्षण मंडळाच्याच बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरातही शाळा प्रवेशोत्सव सोहळा साजरा झाला. भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, उपाध्यक्ष श्रीराम भावे, खजिनदार सीए नचिकेत जोशी, बाल विभागाचे अध्यक्ष दादा कदम व प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत घवाळी, सदस्य संतोष कुष्टे, मुख्याध्यापिका धनश्री मुसळे, शिक्षक, पालक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आकर्षक वेशभूषा करून आलेल्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांना वाजतगाजत त्यांच्या वर्गखोल्यांपर्यंत नेण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष साळवी यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका मुसळे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेने दिलेल्या नूतन वास्तूमध्ये हा वर्गप्रवेश होत असल्याबद्दल प्रबंधक हातखंबकर यांनी आनंद व्यक्त केला.









