छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटचा पुतळा पूर्णपणे सुरक्षित; भराव किंचित खचल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंत्यांचा निर्वाळा

सिंधुदुर्गनगरी : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचा निर्वाळा सार्व‍जनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी आज (१६ जून) दिला. त्यांनी आज पुतळ्याची आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. १४ आणि १५ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा आणि विशेषतः मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेला मातीचा भराव (Backfilling) किंचित प्रमाणात खचला. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पाहणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी या वेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भोवतालच्या परिसराची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. हा खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, हे काम या विभागाकडून अत्यंत तत्परतेने करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. या वेळी अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, उप-अभियंता अजित पाटील, मे. राम सुतार आर्ट क्रिएशनचे प्रतिनिधी त्रिविक्रम प्रभुगावकर, स्वातंत्र्य गुणवत्ता सल्लागार सी. एन. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता सूरज गिरी, अभियंता श्री. बावणे आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply