रत्नागिरी : मुग्धनाद संगीत अकादमीने आयोजित केलेल्या 'नाट्यकुंतल' या साभिनय नाट्यगीत सादरीकरण कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांची संकल्पना असलेल्या आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेला हा कार्यक्रम कै. गजानन भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला होता. मुग्धनाद संगीत अकादमीमधील विद्यार्थ्यांनी यात अतिशय उत्तम सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. मुग्धा सामंत यांच्या मातोश्री श्रीमती सुजाता भट व मामा रवींद्र साठे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले आणि कै.गजानन भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 'नमन नटवरा' या नांदीने सुरुवात झाली आणि त्यानंतर एकाहून एक सुरेल नाट्यगीते सादर केली गेली. यामध्ये नाथ हा माझा, एकला नयनाला, नाही मी बोलत, मी पुन्हा वनांतरी, सजणा का धरिला परदेस , खरा तो प्रेमा, मर्म बंधातली ठेव ही, मधुकर वनवन, नको नको घाई नको, लागी कलेजवा कटार, हे सुरांनो, वद जाऊ कुणाला, प्रीती सुरी दुधारी, उगवला चंद्र पुनवेचा, म्हातारा इतुका, मूर्तिमंत भीती उभी, पावना वामना, अंगणी पारिजात फुलला ही नाट्यपदे होती. पंचतुंड नररुंड माळधर ही संगीत शाकुंतलमधील नांदीही सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता शेवट सं. मूकनायक या नाटकातील 'हे प्रभो विभो' या गीताने झाले. या कार्यक्रमात मुग्धनाद संगीत अकादमीच्या पुणे, मुंबई व रत्नागिरी येथील ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला तबला साथ प्रथमेश शहाणे व ऑर्गनसाथ श्रीरंग जोगळेकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूर्वा खालगावकर यांनी केले. या नाट्यपदांना लागणाऱ्या नेपथ्याची जबाबदारी प्रदीप तेंडुलकर व सहकाऱ्यांनी सांभाळली. ध्वनिव्यवस्था पांडुरंग बर्वे यांनी पाहिली. कार्यक्रमासाठी अतिशय आकर्षक अशी फुलांची रांगोळी प्रशांत जोशी यांनी काढली होती. गुरुकृपा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. कार्यालयाचे नाना मराठे, भगवान दामले, यांच्यासह मंगेश मोरे, खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांचे अकादमीने आभार मानले. सौ. मुग्धा भट सामंत यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करून पालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यासारख्या कार्यक्रमातून रत्नागिरीमध्ये संगीत नाटकाकरिता भावी गायिका-अभिनेत्री लाभेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
Follow Kokan Media on Social Media

