संपकाळाचे वेतन कापावेच!

संपाच्या काळातील वेतन मिळणार नाही, असा कायदाच करायला हवा. संप कितीही काळ करावा. आपल्या मागण्या सहजी मान्य होत नसतील, तर त्या मांडण्यासाठी संप करणे हा कर्मचाऱ्यांचा हक्कच आहे. तो त्यांना अवश्य बजावू द्यावा. पण त्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांना जी झळ पोहोचली, तशी झळ या कर्मचाऱ्यांनाही पोहोचली पाहिजे. संपाची झळ काय असते, याची जाणीव त्यांनाही झाली पाहिजे.

बिनकामाचे वेतन कशासाठी?

राज्यातील दोन टक्के कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. निवृत्तीनंतरचे भरभक्कम वेतन हा त्यांना त्यांचा हक्क वाटतो. पण कोणतीही शाश्वती नसलेले, तुटपुंज्या वेतनात काम करणारे कर्मचारी, मानधनावर काम करणारे कर्मचारी, मोलमजुरीवर जगणारे मजूर आणि यापैकी काहीही मिळत नसलेले कोट्यवधी बेरोजगार महाराष्ट्रात आहेत. काहीही काम न करता शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यापेक्षा तेच वेतन या बेरोजगारांना, तुटपुंजे वेतन, मानधन घेणाऱ्यांना दिले, तर त्यांना कितीतरी मदत होणार आहे.

पर्यटन परिषदेचे फलित

पहिल्या चार वर्षांच्या परिषदांमध्ये पर्यटनाचे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडले गेले असले तरी पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे, रस्त्यांसारख्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, या विचारापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. यावर्षीची परिषद मात्र काहीशी वेगळी ठरली, असेच म्हणावे लागेल. कारण याच परिषदेत अनाहूतपणे मांडल्या गेलेल्या एका मुद्द्यावर एकदम एक कोटीच्या निधीची घोषणा झाली. तेच या परिषदेचे फलित होते.

बोलीभाषा चळवळीचे सूतोवाच

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने राजापूर तालुक्यातील तळवडे या गावी आठवे ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी बोलीभाषा टिकवून ठेवणे किती आवश्यक आहे, याबाबतचे विचार मांडले. बोलीभाषेतून स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडत असते. म्हणूनच बोलीभाषांचे संवर्धन म्हणजे स्थानिक संस्कृतीचे संवर्धनही असते.

लोककलांचा महासंघ व्हावा

चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने पहिल्या लोककला महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. एक विशिष्ट उद्देश ठेवून हा महोत्सव साजरा करण्यात आला. या उद्देशाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे केवळ सादरीकरणाच्या मर्यादेत न राहता कोकणातील सर्वच लोककलाकारांनी एकत्र येऊन त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वाचनालयाला पुढाकार घ्यायला लावून असा महासंघ स्थापन करायला हवा.

उत्सवांचे व्हावेत लोकोत्सव

उत्सव आणि यात्रांचे लोकोत्सवात रूपांतर झाले, तर स्थानिक उद्योजकता निर्माण होईल. प्रत्येक गावाचे काहीना काही वैशिष्ट्य असते. कोकणातील प्रत्येक गाव अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ती परिपूर्णता सार्वजनिक स्वरूपात लोकोत्सवातून प्रकट झाली, तर त्याचा कितीतरी लाभ सर्वांनाच होऊ शकेल.