लोककलांचा महासंघ व्हावा

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने पुढाकार घेऊन कोकणातील विविध लोककलांचा आविष्कार घडविणारा चार दिवसांचा आगळावेगळा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीने उपस्थित राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील लोककलांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची केलेली घोषणा आणि महाराष्ट्रासाठी नव्हे, तर कोकणासाठी तसेच राज्यातील विविध प्रांतांसाठी स्वतंत्र लोककला महामंडळ स्थापन करावे, अशी चिपळूणच्या लोककला महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केलेली सूचना अत्यंत योग्यच होती. याबाबतचे मत याच संपादकीय स्तंभामध्ये यापूर्वीच व्यक्त केले आहे, पण या शासकीय महामंडळापेक्षासुद्धा कोकणातील विविध लोककलांच्या महासंघाची स्थापना व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते.

शासनाने पुढाकार घेऊन महामंडळ स्थापन जरूर करावे. त्यातून लोककलांना राजाश्रय मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, पण बहुतेक सर्व महामंडळांची झालेली दुर्दशा लक्षात घेतली तर सुरुवातीला महामंडळाचे असलेले अवसान नंतर गळून पडते. एक गुळगुळीतपणा येतो. त्यावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना महामंडळाच्या उद्देशापेक्षाही केवळ स्वतःची नोकरी सांभाळावीशी वाटते. ज्या कारणासाठी ते महामंडळ स्थापन केले गेले आहे, त्याविषयी त्यांना काहीही कर्तव्य नसते. अपवाद वगळता हे आजवर अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. पण ते असू द्या. शासन महामंडळ स्थापन करणार असेल, तर ते जरूर व्हावे. पण लोककलांचा इतिहास, लोककलांचे संवर्धन, लोककलाकारांचे भवितव्य यासाठी सर्वच लोककलाकारांनी एकत्र येऊन महासंघाची स्थापना केली पाहिजे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने पहिल्या लोककला महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. एक विशिष्ट उद्देश ठेवून हा महोत्सव साजरा करण्यात आला. या उद्देशाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे केवळ सादरीकरणाच्या मर्यादेत न राहता कोकणातील सर्वच लोककलाकारांनी एकत्र येऊन त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वाचनालयाला पुढाकार घ्यायला लावून असा महासंघ स्थापन करायला हवा.

लोककलांकडे आजही मनोरंजन म्हणून पाहिले जाते. प्रत्येक लोककलेमध्ये काहीतरी आशय दडलेला असतो. त्या त्या कालखंडामध्ये आवश्यक असलेले प्रबोधन त्यातून होत असते. नारदीय कीर्तनाचा जेव्हा केव्हा प्रारंभ झाला, तेव्हापासून नारदांचे जे काही चित्र आपल्या डोळ्यांसमोर आहे, ते लक्षात घेतले तर प्रबोधनाचा हा मुद्दा लक्षात येईल. नारदाला कळीचा नारद असे म्हटले जाते. त्या कथा पौराणिक होत्या, पण लोकमानसावर पौराणिक कथांचा बराच पगडा असतो. कीर्तनासारख्या तेव्हाच्या लोकरंजनाच्या माध्यमातून सद्विचारांचा प्रसार, सद्वर्तनाचा संदेश दिला जात असे. कालौघात अनेक गोष्टी बदलल्या, तरी प्रबोधनाची गरज संपलेली नाही, हे यावेळच्या महोत्सवातील एका परिसंवादात मांडले गेलेले मत म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रबोधनाची साधने बदलली, तरी प्रबोधन आवश्यक असते, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच लोककलांनी कोणता संदेश त्यावेळी दिला, तेव्हाची परिस्थिती कशी होती, याचाही इतिहास संकलित झाला पाहिजे. त्यावेळच्या परिस्थितीशी आताच्या परिस्थितीची सांगड घातली गेली पाहिजे. प्रत्येक लोककलेचा अभ्यास करणारे अभ्यासक एकत्र आले पाहिजेत. त्या त्या अभ्यासकाने आपल्या लोककलेचा विस्तृत अभ्यास करावा आणि त्याची एकत्रित मांडणी महासंघात सादर करावी. शासकीय महामंडळ हे सारे काही करू शकणार नाही. त्याला निधीच्या आणि शासकीय नियमांच्या आणि वैचारिकतेच्या मर्यादा पडू शकतात. महासंघ अमर्याद राहून हे काम करू शकतो. लोककलाकार आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या साऱ्यांनीच हे मनावर घ्यावे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २४ फेब्रुवारी २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply