सध्या महोत्सव आणि संमेलनांचे दिवस आहेत. ठिकठिकाणी साहित्य संमेलने होत आहेत. चिपळूण येथे कोकणातील पारंपरिक लोककलांचा महोत्सव पार पडला. राजापूर तालुक्यात तळवडे येथे दोन दिवसांचे ग्रामीण साहित्य संमेलन झाले. त्रिपुरारी पौर्णिमेपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी कार्तिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. या छोट्या मोठ्या उत्सवांपेक्षा कितीतरी भव्य आणि दिव्य स्वरूपातील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव कोल्हापूरजवळच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाने आयोजित केला आहे. त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील कलांचे सादरीकरण आणि उद्योगांचे प्रदर्शन भरणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणाचे मूळ सूत्र घेऊन हा भव्य लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. देशी बियाणे, जैविक खत, जैविक कीड नियंत्रक प्रक्रिया समजावून सांगणारे प्रदर्शन, देशी प्रजातीच्या गाई, म्हशी, बकऱ्या, घोडे, गाढव, कुत्रे आणि मांजरांचे प्रदर्शनही होणार आहे. उत्सवात देशभरातील पारंपरिक वैद्य सहभागी होणार आहेत. लुप्त होत चाललेली भारतीय चिकित्सा पद्धत टिकवण्यासाठी वैद्यांचे संमेलन होणार आहे. उत्सवात जगभरातील ५० देशांमधून नामवंत संशोधक, अभ्यासक आवर्जून उपस्थित राहणार आहेत. पाचशे विद्यापीठांचे कुलगुरू, देशभरातील हजारो संत-महंत, विविध समाजसेवी संस्थाही सहभागी होणार आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणी होणारे छोटे-मोठे उत्सव, महोत्सव, संमेलने आणि कोल्हापूरचा भव्य लोकोत्सव लोकांनी एकमेकांशी संपर्क साधावा, संपर्कक्रांतीच्या आजच्या काळात दूर गेलेला माणूस एकमेकांच्या जवळ यावा, त्यातून विधायक गोष्टी घडाव्यात, या उद्देशाने भरविला जात आहे. लोकांनी एकत्र यायला हवे, हे पुन्हा एकदा नव्याने सांगायची वेळ आली आहे. ते लोकांना पटतही आहे, हे या संमेलनांना आणि महोत्सवांना होणाऱ्या गर्दीवरून दिसून येते. लोकांनी एकत्र यावे, यासाठी होणारे उत्सव ही कल्पना काही नवीन नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले गणेशोत्सव आणि शिवजयंतीचे उत्सव ही महत्त्वाची उदाहरणे आहेतच. पण त्यापूर्वीपासूनही गावागावांमध्ये भरणाऱ्या यात्रा लोकांच्या एकत्रीकरणासाठीच भरविल्या जात असत. ती परंपरा राखण्यासाठी दरवर्षी उत्सव साजरे केले जातात.
हे उत्सव आता लोकोत्सवामध्ये रूपांतरित झाले पाहिजेत. मोठे उत्सव करायचे झाले, तर त्यावर प्रचंड प्रमाणात खर्च होतो. त्या उत्सवात सहभाग घेणे सर्वसामान्यांना सोयीचे ठरतेच, असे नाही. अंतर, राहण्याची व्यवस्था आणि प्रवास याचा विचार करता अशा मोठ्या उत्सवांमध्ये मोजकेच लोक सहभागी होऊ शकतात. पण गावोगावी ग्रामदैवते किंवा अन्य दैवतांसाठी होणारे उत्सव मूळ पद्धती कायम ठेवून बदलत्या स्वरूपात साजरे करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. महिला बचत गटांचे मोठे जाळे ग्रामीण भागात पसरले आहे. छोटे-मोठे उद्योगही गावागावांमध्ये सुरू झाले आहेत. त्या साऱ्यांना बाजारपेठेची आवश्यकता असते. त्याचबरोबर त्यांना स्वतःची उद्योजक आणि विक्रेते म्हणून ओळखही हवी असते. लोकोत्सवामुळे ती साध्य होऊ शकेल. कणेरी मठाने आयोजित केलेल्या लोकोत्सवापासून प्रेरणा घेऊन त्याची छोटी प्रतिकृतीच उत्सवांच्या निमित्ताने गावागावांमध्ये साकारता येऊ शकेल. पारंपरिक आणि धार्मिक स्वरूपामुळे उत्सवांमध्ये ठरावीक विधी पार पडतात. त्याकडे केवळ उपचार म्हणून पाहिले जाते. पण याच उत्सव आणि यात्रांचे लोकोत्सवात रूपांतर झाले, तर स्थानिक उद्योजकता निर्माण होईल. प्रत्येक गावाचे काहीना काही वैशिष्ट्य असते. कोकणातील प्रत्येक गाव अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ती परिपूर्णता सार्वजनिक स्वरूपात लोकोत्सवातून प्रकट झाली, तर त्याचा कितीतरी लाभ सर्वांनाच होऊ शकेल.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १७ फेब्रुवारी २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – १७ फेब्रुवारी २०२३ चा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia17feb येथे क्लिक करा.
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : उत्सवांचे व्हावेत लोकोत्सव https://kokanmedia.in/2023/02/17/skmeditorial17feb/
मुखपृष्ठकथा : जगाला दिशा देऊ शकणारा सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव : सविस्तर माहिती देणारा लेख…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

