रत्नागिरी : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, या शिक्षकांच्या मागणीबाबत एक समिती स्थापन करून त्याचा योग्य निर्णय सकारात्मक पद्धतीने घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. येथील चंपक मैदानावर शिक्षकांचा हा भव्य मेळावा झाला. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा करून मुख्यमंत्री म्हणाले की, जे होणार असेल तेच बोलणार आणि ते निश्चित करू. जेथे कोणीही पोहोचत नाही तिथे शिक्षक पोहोचतो, या शब्दांत शिक्षकांचे कौतुक करून श्री. शिंदे म्हणाले, आई-वडिलांनंतर शिक्षकांनाच आदराचे स्थान असते. भारत हा तरुणाईचा देश आहे. या तरुणाईला घडवण्याचे काम शिक्षक करीत आहे. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. पण तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात कितीतरी बदल झाला आहे. आधुनिकता आली. मात्र तंत्रज्ञान कितीही वाढले तरी शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते कधीही बदलू शकणार नाही. शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाचा श्री. शिंदे यांनी आवर्जून उल्लेख केला. आज शिक्षकांना फक्त ज्ञानदानाचे काम देणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले की, शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणे शासनाची जबाबदारी आहे, त्या निश्चित पूर्ण केल्या जातील. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. पण पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांनीही आवर्जून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षक भवनासाठी निश्चित जागा दिली जाईल. उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने आम्ही शिक्षकांच्या मागण्यांसाठी संपूर्ण सहकार्य करू. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ग्रोथ इंजिनच आहे. दीपक केसरकर यांकडे शिक्षण खात्याचा दिलेला भार ते उत्तमरीत्या सांभाळत आहेत, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, याबरोबरच शासनाने, सरकारने घेतलेले सर्व निर्णय सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून घेतले आहेत. राज्यातील अनेक प्रकल्प बंद होते ते पुन्हा सुरू केले, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, प्राथमिक शिक्षणाचा पाया अतिशय समर्पित भावनेने शिक्षक करीत आहेत. खूप चांगले शिक्षण देऊन चांगल्या पदांवर आज मुले काम करीत आहेत. शिक्षकांचे प्रश्न एकत्र बसून सोडवू, असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला या अधिवेशनात जाहीर करण्यास सांगितले आहे. संभाजीराव ऊर्फ तात्यासाहेब नि:स्वार्थीपणे काम करणारे अध्यक्ष आहेत. मी त्यांचे कौतुक करतो.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संवेदनशील असून ते अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत. पेन्शनची मागणी सर्वत्र कार्यक्रमात होत आहे. संभाजी थोरात यांनी शिक्षकांनाही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास प्रोत्साहित करावे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, विद्यार्थी हा शिक्षणाचा आत्मा आहे. मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी शिक्षणविषयक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. माध्यमिक शिक्षकांसह प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले. शिक्षकसुद्धा शिक्षण खात्यात मोठे अधिकारी व्हावेत, अशीही आमची इच्छा आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. केंद्रप्रमुखांच्या जागा १०० टक्के भरल्या जातील. तसेच ३० हजार शिक्षकांची भरती पुढील दोन महिन्यांत शासन करणार आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास वाजे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सरुडकर आणि स्वाती शिंदे-पवार यांनी केले. सुरुवातीला स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महसूल मंत्र्यांचा दौरा रत्नागिरीचा, लक्ष अहमदनगरच्या अन्नविषबाधित मुलांकडे
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर असले, तरी तेथूनही त्यांचे लक्ष आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील अन्नविषबाधित मुलांकडे होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी संबंधितांशी संवाद साधला आणि मुलांची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
दर्यापूर (जि. अमरावती) येथील आदर्श हायस्कूलमधील २३० मुले आणि १५ शिक्षक शिर्डीत सहलीसाठी आले होते. शेगाव, अहमदनगर येथून ते सर्वजण काल रात्री श्रीक्षेत्र देवगडकडे जाणार होते. काल दुपारी शेगाव येथे त्यांनी स्वतः तयार केलेले जेवण जेवल्यानंतर रात्री १० च्या सुमारास त्यांना जाणवू लागला. त्यातील ८४ मुले आणि ४ शिक्षकांना उपचारासाठी साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आज शिक्षक महाअधिवेशनानिमित्ताने श्री. विखे-पाटील रत्नागिरीत होते. ते महसूलमंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना अन्नविषबाधेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत शिर्डी उपविभागीय अधिकारी आणि साईबाबा संस्थानचे साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांच्यासह संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या. वेळोवेळी याबद्दलची माहिती घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अवगत केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विखे-पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासमवेत असताना थेट अहमदनगर येथे संबंधित अधिकारीवर्गाकडून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती जाणून घेऊन आस्थेने चौकशी केली. उपचाराअंती सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. मुलांची काळजी घेण्याबाबतचे आदेश संबधितांना त्यांनी दिले आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

