रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या नव्या अद्ययावत तरीही साध्या बस आज रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ताफ्यात दाखल करण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवीन बसमधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहापासून शासकीय विश्रामगृहापर्यंत प्रवासही केला.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्याकरिता ५० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बीएस-6 प्रणालीतील या गाड्या अद्यायावत सोयींनी सुसज्ज आहेत. लाल परीचेच हे आधुनिक रूप आहे. भाडेतत्त्वावरील या बसेस दाखल होत असून पहिला टप्प्यामध्ये ५० बसेस रत्नागिरी विभागात दाखल होत आहेत. या बसद्वारे रत्नागिरी, चिपळूण आणि खेड आगारामार्फत लांब तसेच मध्यम लांब पल्ल्याच्या मार्गावरील फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यापैकी रत्नागिरी आगारामध्ये वीस बसेस दाखल झाल्या आहेत. त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. खेड आगाराला ११, तर चिपळूण आगारास १९ गाड्या मिळणार आहेत.
या गाड्यांचे दरवाजे स्वयंचलित असून प्रत्येक आसनाकरिता स्वतंत्र चार्जिंग पॉइंट देण्यात आला आहे. सर्व आसने पुशबॅक पद्धतीची असून फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टीम या अद्ययावत आगनियंत्रण प्रणालीला समावेश बसमध्ये करण्यात आला आहे. बसला एअर सस्पेन्शन असून पॅनिक म्हणजे आणीबाणीची वेळ आल्यास विशेष बटणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी या बसचे भाडे सध्या सुरू असलेल्या साध्या बसप्रमाणेच असेल.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

