महिला बचत गटांचे पहिले सुपर मार्केट रत्नागिरीत सुरू

रत्नागिरी : राज्यातील महिला बचत गटांचे पहिले सुपर मार्केट रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू झाले.

केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आणि रत्नागिरी पालिकेच्या माध्यमातून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या इमारतीमध्ये हे सुपर मार्केट तयार करण्यात आले आहे.

महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या सुपर मार्केटमधील सर्व उत्पादने महिला बचतगटांनी तयार केलेली आहेत. त्यामुळे या उत्पादनांचा दर्जा निश्चितच उत्तम असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलेल्या सुपर मार्केटप्रमाणे राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये बचतगटांसाठी सुपर मार्केट तयार करण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सोनचिरैया सुपर मार्केटची पाहणी करून या मार्केटमधील उत्पादनांची माहिती घेतली.

उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील १६० बचतगटांनी एकत्र येऊन हे मार्केट उभारले आहे. महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता सोनचिरैया सुपरमार्केट उभारण्यात आले असून राज्यातील पहिले बचतगटांचे सुपर मार्केट रत्नागिरी जिल्ह्यात सुरु करण्यात आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. रत्नागिरीतील या सुपरमार्केटप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही बचतगटांसाठी विक्री केंद्र उभारण्यात येणार असून त्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून साडेसात कोटीची तरतूद करण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी आमदार योगेश कदम, नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply