रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्योगिनी व महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाची सांगता बक्षीस वितरणाने आठ मार्च रोजी झाली. या वेळी संयोजिका प्राची शिंदे यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा मोहिते आणि पावसच्या आनंदी वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रगती खातू यांचा सन्मान केला.
या वेळी शिल्पा पटवर्धन म्हणाल्या, ‘महिलांनी स्वतःकडे असलेल्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. महिला ही अष्टपैलू असते, घरातील सर्व कामे करते; पण तिला कमी लेखले जाते. हे चित्र बदलण्यासाठी आपण आदर्शवत काम केले पाहिजे. दररोज एक नवीन गोष्ट शिकली पाहिजे. प्राची शिंदे यांचे महिला बचत गटांसाठीचे काम धडाडीने सुरू आहे.’
‘आनंदी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना भेटायला नक्की या, येताना काही आणले नाही तरी चालेल पण त्यांच्याशी संवाद साधायला या,’ असे आवाहन आनंदी वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रगती खातू यांनी केले. पौर्णिमा साठे यांनी सूत्रसंचालन केले. महिला पत्रकार मीरा शेलार, मेहरून नाकाडे, अनघा निकम, शोभना कांबळे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी डॉ. स्वप्नजा मोहिते म्हणाल्या, ‘या प्रदर्शनामुळे मला नवीन मैत्रिणी मिळाल्या. मार्केटिंग कसे करायचे, हे चार दिवसांत शिकता आले. सर्वच उद्योगिनी व महिला बचत गट यांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्याला प्राची शिंदे यांनी दिशा दिली आहे.’
पाच दिवसांच्या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीकरांनी उद्योगिनींच्या स्टॉलला भेट देऊन वस्तू खरेदी केली. खाद्यपदार्थांच्या स्टॉललाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे महिलांनी सांगितले. समारोप कार्यक्रमावेळी शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून समाजप्रबोधन करणारे स्किट व नृत्य सादर केले. त्यानंतर कारवांचीवाडी येथील शिवरत्न महिला ग्रुपने मंगळागौर हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media