रत्नागिरी : खल्वायन या संस्थेची सलग २६९वी मासिक संगीत सभा शनिवारी, १४ मार्च २०२० रोजी होणार आहे. त्यात गोव्याच्या प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा गावकर यांच्या शास्त्रीय, तसेच अभंग, नाट्यगीत गायनाची मैफल रंगणार आहे.
ही मैफल नेहमीप्रमाणेच सायंकाळी सात ते नऊ या वेळेत रत्नागिरी एसटी स्टँडसमोरच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार आहे. कै. अरुअप्पा जोशी स्मृती मासिक संगीत सभा म्हणून ही मैफल रंगणार आहे.
मुग्धा गावकर यांना वयाच्या सहाव्या वर्षापासून सौ. विजया नागराळी यांच्याकडे पाच वर्षे शास्त्रीय संगीताचे धडे मिळाले. त्यानंतर पाच वर्षे श्री. दामोदर चारी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर सात वर्षे पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य डॉ. लक्ष्मीकांत सहकारी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. गेल्या अडीच वर्षांपासून मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर (पं. जसराज यांचे पट्टशिष्य) यांच्याकडे त्या शास्त्रीय संगीताचे विशेष अध्ययन करत आहेत.
गांधर्व महाविद्यालयाची विशारद ही परीक्षा त्या विशेष श्रेणीत उत्तीर्ण आहेत. तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून शास्त्रीय संगीतातील एमए ही पदवी सुवर्णपदकासह त्यांनी प्राप्त केली आहे. गांधर्व महाविद्यालयातून संगीताचार्य (पीएचडी) पदवीचा अभ्यास नुकताच त्यांनी सुरू केला आहे. आकाशवाणीच्या शास्त्रीय, अभंग व नाट्यगीतासाठीच्या त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत.
कलासंस्कृती विभाग, गोवा व पं. जसराज ट्रस्ट, पुणे यांच्यातर्फे त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे. शब्दसुरांच्या रेशीमगाठी, भक्तिप्रज्ज्वला इत्यादी त्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झालेल्या आहेत.
दै. गोमंतक, गोवा युवा मंच, बालभवन गोवा, सम्राट क्लब गोवा इत्यादी संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मुंबई, पणजी-गोवा, काणकोण, फोंडा, कारवार-कर्नाटक , कुडाळ इत्यादी ठिकाणच्या प्रसिद्ध संगीत संमेलनात त्यांचे शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम सादर झालेले आहेत.
रत्नागिरीतील मैफलीला रत्नागिरीचे प्रसिद्ध वादक श्री. हेरंब जोगळेकर (तबला) व श्री. मधुसूदन लेले (हार्मोनियम) हे साथसंगत करणार आहेत. या संगीत सभेचा आस्वाद सर्व रसिक श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोहर जोशी यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media