सोशल मीडियाचा प्रभावी वापर; रत्नागिरीत अडकलेल्या तामिळी तरुणांची रत्नागिरी पोलिसांकडून भोजनव्यवस्था

रत्नागिरी : रत्नागिरीच्या एमआयडीसीत अडकून पडलेल्या दोनशे तामिळी तरुणांची भोजनाची व्यवस्था रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, तर त्यांच्याकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना आलेल्या ट्विटर संदेशाची त्वरित दखल घेऊन मुंढे यांनी ही व्यवस्था केली.

रत्नागिरीच्या एमआयडीसीमध्ये विविध उद्योगांमध्ये काम करण्यासाठी सुमारे दोनशे तामिळी तरुण काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीत आले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे एमआयडीसीतील सर्व कारखाने बंद आहेत. हे सर्व तामिळी तरुण रोजंदारीवर कामाला होते. त्यामुळे एमआयडीसीतील उद्योगांकडून त्यांना मानधन दिले गेले नाही. गेल्या आठ दिवसांपासून रोजंदारी मिळत नसल्यामुळे त्यांचे हाल होत होते. त्यांनी याबाबतचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला. तो तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडिप्पाडी पळणीस्वामी यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरद्वारे ही माहिती कळविली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने रत्नागिरीच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हा निरोप पोहोचविला. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी लगेच संबंधितांचा शोध घेतला आणि अन्नपाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या तामिळी तरुणांना भोजन देण्याची व्यवस्था केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचीही व्यवस्था केली. या सगळ्या घडामोडी अवघ्या काही तासांत घडल्या.

या तरुणांनी आपल्याला रोजगार नसल्याने तामिळनाडूत परत जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली; मात्र सध्या संचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सर्वच सीमा बंद करण्यात आल्यामुळे, तसेच वाहतुकीची कोणतीही सोय उपलब्ध नसल्यामुळे या तरुणांना जिल्ह्याच्या बाहेर जाऊ दिले जाणार नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले. संचारबंदी लागू असेपर्यंत त्यांना भोजनासाठी आवश्यक सुविधा पुरविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरीच्या पोलिसांनी तामिळी तरुणांची भोजनाची व्यवस्था केल्याबद्दल केल्याचे समजल्यानंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून रत्नागिरी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply