दापोली नगर पंचायतीत शून्य खर्चात निर्जंतुकीकरण कक्ष

दापोली : जुन्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून दापोली नगर पंचायतीने शून्य खर्चात तयार केलेल्या स्वयंचलित निर्जंतुकीकरण कक्षाचे उद्घाटन आज (ता. १३ एप्रिल) झाले. करोना प्रतिबंधाचा उपाय म्हणून नगर पंचायत कार्यालयात या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे पंचवीस हजार रुपयांची बचत झाली आहे.


दापोलीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, नगराध्यक्षा परवीन शेख आणि इतर सदस्यांच्या संकल्पनेतून हा कक्ष साकार झाला आहे. शहरातील काळकाई कोंड येथील शौकत इलेक्ट्रिकल्स आणि जालगाव येथील ओम साई वेल्डिंग वर्क्सच्या मदतीने जुन्या साधनसामग्रीतून स्वयंचलित सेन्सरचा वापर करून कक्ष उभारण्यात आला. त्यासाठी ३०० लिटर पाण्याची टाकी, अर्धा एचपी मोटार, सेन्सर, लोखंडी फ्रेम, नोझल इत्यादी साहित्य वापरण्यात आले आहे. सर्व साहित्य नगर पंचायतीकडे उपलब्ध असल्याने या कक्षासाठी कोणताही वेगळा खर्च करावा लागला नाही. निर्जंतुकीकरणासाठी सौम्य प्रमाणात डिटर्जंट, सौम्य लायझॉल, ०.०५ टक्के सोडियम हायपोक्लोराइ़ड वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची त्वचा किंवा कपड्यांना बाधा पोहोचणार नाही किंवा कोणतीही हानी होणार नाही. कक्षातून बाहेर पडल्यानंतर हॅण्ड वॉशसाठी बेसीनची व्यवस्था करण्यात आली असून तेथे हात धुण्यासाठी साबणही ठेवण्यात आला आहे. कक्षाचा उपयोग नगर पंचायतीचे स्वच्छता कर्मचारी, इतर अधिकारी, कर्मचारी, नगर पंचायतीच्या इमारतीत असलेले एटीएम तसेच बँकेत येणाऱ्या नागरिकांना निर्जंतुकीकरणासाठी होणार आहे.


या कक्षाचे उद्घाटन आज सकाळी झाले. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी कक्षाविषयीची माहिती दिली. यावेळी दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, नगराध्यक्षा परवीन शेख, उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर, स्वच्छत आणि आरोग्य समिती सभापती मंगेश राजपूरकर, महिला आणि बालकल्याण समिती सभापती शबनम मुकादम, सदस्या सौ. कृपा घाग, प्रकाश साळवी, सौ. उल्का जाधव, , शौकत इलेचे मुसा काझी, कर्मचारी दीपक सावंत इत्यादी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply