मुख्यमंत्र्यांचा सहाध्यायी रत्नागिरीत नव्या संधीच्या प्रतीक्षेत

सदानंद भोगले

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सहाध्यायी सदानंद भोगले हा सध्या रत्नागिरीत राहणारा कलाकार करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे बंद पडलेले कलेतून रोजगाराचे साधन पुनरुज्जीवित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. श्री. भोगले यांची रत्नागिरीत त्यांच्या घरी भेट घेतली असता त्यांचा दुर्दम्य आशावाद आणि कलेविषयीची आत्मीयता लक्षात आली.
श्री. भोगले हे प्रथितयश हाडाचे चित्रकार कलावंत आणि त्यांचे कुटुंब मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे (ता. मालवण) गावचे रहिवासी आहेत. तीन भाऊ आणि चार बहिणी असे त्यांचे कुटुंब. मुंबईत वडील मोरारजी मिलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. ते तेव्हा वरळीत राहत असत. मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये श्री. भोगले यांनी कमर्शियल आर्टची पदवी संपादन केली. दामू केंकरे प्रमुख असताना त्यांनी जेजे स्कूलमध्ये प्रवेश घेतला, तर बाबूराव सडवेलकर प्रमुख असताना त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. याच दरम्यान सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेत होते. त्या अर्थाने श्री. भोगले यांचे ते सहाध्यायी होते.

पदवी प्राप्त केल्यानंतर श्री. भोगले यांनी लिंटास, एव्हरेस्ट, एव्हरेस्टचीच शाखा असलेली एज कम्युनिकेशन, रिडीफ्यूजन, रतन बात्रा अशा नामवंत जाहिरात कंपन्यांमध्ये नोकरी केली. याच दरम्यान १९८७ झाली त्यांना अर्धांगवायू झाल्यामुळे नोकरी सोडावी लागली. मात्र नंतर त्यांनी स्वतंत्रपणे कामे सुरू केली. पार्ले बिस्किट, मेलडी चॉकलेट, स्टॅनरोज सूटिंगशर्टिंग, इमामी अशा विविध उत्पादनांच्या जाहिराती त्यांनी केल्या. नोकरीत असताना एका रात्रीत तब्बल 60 लेआऊटसुद्धा त्यांनी केले. लोणावळ्याजवळच्या प्रसिद्ध ॲम्बी व्हॅलीचे कामही त्यांनी केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत त्यांच्यासह दत्ताजी साळवी, वामनराव महाडीक यांच्याही संपर्कात ते होते. बाळासाहेबांची आणि शिवाजी महाराजांची अनेक पोर्ट्रेट तसेच सुरुवातीच्या काळातील शिवसेनेच्या अनेक निवडणुकांचे जाहिरात साहित्य, पोस्टर्स भित्तीपत्रके त्यांनी तयार केली होती.

प्रकृतीच्या कारणामुळे श्री. भोगले २००३ मध्ये रत्नागिरीत आले. रत्नागिरीत जाहिरात एजन्सी नसल्यामुळे त्यांना त्या पद्धतीचे काम मिळण्याची शक्यता नव्हती. तांत्रिकदृष्ट्या ‘आर्ट’ हा विषय काळानुरूप बदलत गेला, पण त्यांनी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून पदवी घेतली असल्यामुळे त्यांना कलेच्या क्षेत्रातील कामाचा तुटवडा भासला नाही. रत्नागिरीत आल्यानंतर प्रामुख्याने इंटीरियर डेकोरेशन, इमारतींचे अंतर्बाह्य रंगकाम अशा स्वरूपाचे काम त्यांनी केले. सजावटीच्या कामाचे अंदाजपत्रक देण्याचे काम प्रमुख्याने करतात. त्याच्याच आधारे तीन मुलींचे शिक्षण आणि एकीचा विवाह त्यांनी केला. दोघी मुलींपैकी एक मुलगी ट्यूशन घेते, तर दुसरी इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावते.

करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात मात्र सारेच व्यवहार ठप्प झाले आणि आर्थिक आवक थंडावली आहे. मात्र अशाही स्थितीत उद्धव आणि राज ठाकरे सहाध्यायी असले, तरी मी कॉलेजमध्ये होतो त्याच काळात त्यांनी तेथे शिक्षण घेतले एवढाच तो एक निव्वळ योगायोग होता. बाकी त्यांच्याकडून कोणती अपेक्षा आपल्याला नाही. सहाध्यायी होते, म्हणून मला त्यांच्याकडून काहीतरी मिळावे, असे मला वाटत नाही. जीवनावश्यक वस्तू किंवा कोणत्याही आर्थिक मदतीची अपेक्षा श्री. भोगले यांना नाही. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर पडताना कलेच्या क्षेत्रातच असलेल्या वेगळ्या संधी आणि रोजगाराची नवी साधने मिळावीत, अगदी हातावर पोट नसले तरी दैनंदिन कौटुंबिक गरजांसाठी ठरावीक उत्पन्न मिळण्यासारखे साधन मिळावे, अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. आपल्यासारख्याच इतर कलाकारांनीही पोटापाण्यासाठी नवनव्या कल्पना शोधून काढाव्यात, कलेतील विविध आविष्कारांप्रमाणेच नव्या संधी शोधून काढाव्यात, असे त्यांना वाटते.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी श्री. भोगले यांच्या परिस्थितीविषयी कळविले होते. मात्र लॉकडाऊनमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील आढावा बैठकांमध्ये श्री. सामंत व्यस्त असल्यामुळे त्यांना श्री. मालुसरे यांच्या पत्राची दखल घेण्याएवढा वेळ मिळाला नसावा.
……….
संपर्कासाठी –
श्री. सदानंद भोगले,
092/283, म्हाडा फेज,
कोकण नगर, रत्नागिरी
(8888113960)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply