भावगीत रसिकांसाठी आठवणीतील स्वरभावयात्रा फेसबुकवर …

डोंबिवली : डोंबिवलीतील अलीकडेच दिवंगत झालेले हरहुन्नरी कलाकार विनायक जोशी यांच्या स्वरभावयात्रा या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आज (ता. १० मे) फेसबुकवरून होत आहे. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जात असून रत्नागिरीतील कोकण मीडियातर्फेही हा कार्यक्रम अधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे घरच्या घरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, यासाठी तो फेसबुकवरून प्रसारित केला जात आहे.

भावगीते हा मराठी संगीतातील महत्त्वाचा भाग आहे. डोंबिवलीचे विनायक जोशी म्हणजे
भावगीतांवर प्रचंड प्रेम असलेले आणि त्या भावगीतांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करून त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारे डोंबिवलीकरांचे लाडके व्यक्तिमत्त्व. स्वरभावयात्रा हा त्यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि डोंबिवलीकरांसाठी मानबिंदू ठरलेला कार्यक्रम आहे. डोंबिवलीतील

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वसंतोत्सव २०१६ मध्ये स्वरभावयात्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी भावगीतांची ९० वर्षे हे त्याचे औचित्य होते.

डोंबिवलीकर रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.

भावगीत विश्वात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या विनायक जोशी यांचा दि.११ मे रोजी साठावा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून मंडळाने वसंतोत्सवात सादर झालेल्या स्वरभावयात्रा ह्या कार्यक्रमाचे चित्रीकरण मंडळाच्या फेसबूक पेजवरून प्रक्षेपित करण्याचे ठरवले आहे.
या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणासाठी परवानगी दिल्याबद्दल विनायक जोशी यांचे सुपुत्र गंधार जोशी आणि कुटुंबीयांबद्दल टिळकनगर गणेशोत्सव मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच कार्यक्रमाचे चित्रीकरण करणारे सुप्रसिद्ध छायाचित्रकार मनोज मेहता, कार्यक्रमाच्या फेसबुकवरून होणाऱ्या प्रक्षेपणासाठी तांत्रिक सहकार्य करणारे प्रसिद्ध कलाकार आदित्य बिवलकर यांचेही विशेष आभार मंडळाने मानले आहेत.

कार्यक्रमाचा तपशील असा :
दिनांक १० मे २०२०

भाग १: सकाळी १० वाजता

भाग २: दुपारी १२ वाजता.

भाग ३: सायं ४ वाजता.

भाग ४: सायं ६ वाजता.

कार्यक्रमाच्या फेसबुक पेजवर जाण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा-

(विनायक जोशी यांना त्यांच्या सुहृदाने वाहिलेली आदरांजली)

वाsss क्या बात है !

कुणाचं निधन झाल्यावर हे वाक्य आठवणं आणि ते उद्धृत करणं हे कुणालाही औचित्यभंग करणारं वाटेल. पण विनायक जोशी या नखशिखांत परफॉर्मर कलाकाराच्या बाबतीत ते माझ्यासाठीतरी सयुक्तिक आहे.
आज पहाटे (१६ फेब्रुवारी २०२०) विनायकच्या धक्कादायक निधनाची बातमी कानी आल्यापासून अनेक प्रसंग – आठवणींचे तुकडे मनात गर्दी करत आहेत. या बहुसंख्य तुकड्यांमध्ये विनायकच्या तोंडी “वाsss क्या बात है !” हे वाक्य ऐकलं आहे. मला खात्री आहे की त्याच्याशी थोडीशीही ओळख असलेल्या प्रत्येकाने हे वाक्य ऐकलं असेल.

अगदी सुरुवातीची विनायकची आठवण आजपासून तिसेक वर्षांपूर्वीची आहे. चतुरंग प्रतिष्ठान ही आज महाराष्ट्रात नामांकित असलेली संस्था तेव्हा बहरास येत होती. चतुरंगची डोंबिवली शाखा नुकतीच स्थापन झाली होती. ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या उपक्रमाने रसिकांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. मी आणि पराग रामनाथकर, विनायक कुलकर्णी हे माझे जे.जे.तील दोन मित्र “काय आहे बुवा हे चतुरंग?” अशा कुतूहलाने चतुरंगच्या मीटिंगला गेलो. पहिल्या दर्शनी प्रेमात पडावं तसं मी चतुरंगमध्ये गुंतलो. चतुरंगच्या म्हणजे कार्यकर्त्यांच्या! उत्साही आणि सर्व गोष्टींमध्ये पुढाकार घेणारा प्रमोद फाटक, नेमस्त आणि सज्जन असे किरण जोगळेकर, विनय दातारकाका, शरद तळवेलकरकाका, चंद्रशेखर आणि गिरीश हे टिळक बंधू, कोनकर, अत्रे काका अशांबरोबर विनायक जोशीसुद्धा सुरुवातीपासूनचा प्रमुख कार्यकर्ता होता. यांच्यापुढे आम्ही अगदीच बच्चे होतो. पण त्यांनी आम्हाला नेहमी प्रोत्साहनच दिलं. मग माझ्यामागून माझ्या परिचयाची अनेक तरुण मंडळी चतुरंगमध्ये रंगून गेली.

विनायकमध्ये एक अंगभूत धोरणीपणा होता. आवश्यक तिथे भरपूर मेहनत घेण्याची तयारी होती. प्रमोद, जोगळेकर, चंद्रशेखर टिळक आणि तो कॉलेजमधले वर्गमित्र होते. प्रत्येकाची बलस्थानं वेगळी होती. विनायक उत्तम गायक असल्याने त्याला कलाकारांशी कसं बोलायचं, संपर्क करायचं हे सहजसाध्य होतं. व्यासपीठावर त्याचा वावर सहज असे. त्याचं काहीसं आलंकारिक व नाट्यमय वक्तृत्व रंगमंचावरील मान्यवरांना आणि प्रेक्षकांना आवडायचं. जोगळेकरांना आम्ही त्यांच्या पोक्तपणामुळे अहो-जाहो करत असलो तरी विनायकला कधीच अरे विनायक म्हणू लागलो होतो.

सर्वच कार्यकर्त्यांचं विविध निमित्तांनी व निमित्ताशिवायही घरी येणं-जाणं वरचेवर असे. गणपतीला स्वतःच्या घरी प्रतिष्ठापना झाल्यावर सायकलवर टांग टाकून सगळ्यांनी मिळून सर्वांकडे दर्शनाला जायचं आणि अथर्वशीर्षआवर्तन करायचं, हे अजून आठवतंय. त्या दीड दिवसांतील एक घाईचे घर विनायकचे होते. कार्यकर्ता कौटुंबिक मेळाव्याला तर सर्वांच्याच घरची मंडळी एकत्र यायची.

पुढे चतुरंगच्या संगीतस्पर्धा, दिवाळी पहाट, होलिकोत्सव, चैत्रपालवी संगीतोत्सव अशा संगीतविषयक उपक्रमांतून विनायक अधिकाधिक मोठ्या जबाबदाऱ्या घेत ज्येष्ठ कार्यकर्ता झाला. चतुरंगच्याच वर्षासहल या उपक्रमात विनायकने त्याचा पुढे लोकप्रिय झालेला ‘सरीवर सरी’ सादर केला. गायिका मृदुला दाढे आणि तीन वादक हे सोडले तर तीन प्रमुख कलाकार चतुरंगचे कार्यकर्ते होते. मुख्य गायक स्वतः विनायक, निवेदक भाऊ मराठे आणि सूरसंगत गिरीश प्रभू. हा कार्यक्रम जबरदस्त रंगला. बाहेर पावसाळी हवा आणि आत पावसाची एकाहून एक चिंब गाणी! पुढे हा कार्यक्रम अनेक ठिकाणी झाला. त्यानंतर विनायकने मागे वळून पाहिलं नाही. सैगल गीतांचा ‘बाबुल मोरा’, ‘स्वरभावयात्रा’, ‘येई वो विठ्ठले’ असे वेगवेगळे कार्यक्रम त्याने खूप मेहनतीने तयार केले व ते रसिकप्रियही झाले.
बॅन्क ऑफ इंडियातील नोकरी, संगीत साधना व कार्यक्रम आणि चतुरंगचे कार्यक्रम अशा तिन्ही ठिकाणी तो तोल सावरून यशस्वीपणे सक्रिय होता.

माझा-त्याचा एका वेगळ्या कारणाने जास्त संबंध आला. विनायकचा एकुलता एक मुलगा गंधार अगदी तान्हा असल्यापासून रामनगरमध्ये सौ. मोडक काकूंकडे सांभाळायला होता. त्यामुळे मोडक कुटुंबाबरोबर विनायकचं अगदी घट्ट नातं जुळलं होतं. तेव्हा आम्ही सर्वच जण चतुरंग प्रेमाने झपाटलेले होतो. जसे माझे जवळजवळ सर्व मित्र, ओळखीचे, चतुरंग कार्यकर्ते होतील असे मी प्रयत्न केले तसे विनायकनेही त्याची भाची मैथिली आणि मोडक काकूंच्या दोन्ही मुली पूनम आणि प्रीतम यांना कार्यकर्त्या होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पुढे माझं पूनमशी लग्न झाल्यामुळे मोडक काकूंचा जावई म्हणून विनायक आणि कुटुंबाबरोबर माझं विशेष नातं जुळलं. पुढे गंधारबरोबरही छान मैत्री जमल्याने चतुरंगबरोबरच्या गाठी सुटल्यावरही विनायक व जोशी कुटुंबाशी संपर्क सुरू राहिला.

महिन्याभरापूर्वीच आमच्या घरी मानसी या मोडककाकूंनी सांभाळेल्या लेकीच्या केळवणाच्या निमित्ताने सर्व पालक व मुलं आमच्या घरी एकत्र जमलो होतो. तेव्हा विनायक, सीमा वहिनी, गंधार व गेयश्रीसुद्धा होते मानसीचे बाबा आणि विनायक जुने रामनगरनिवासी असल्याने त्यांच्या त्या गप्पा रंगल्या होत्या. विनायक थोडा थकल्यासारखा वाटत असला तरी ‘आजोबा’ या बढतीच्या कल्पनेमुळे खुष होता. मानसीसाठी त्याने ‘चांद आला शिरी’ हे यशवंत देवांचं एक अप्रकाशित असं खास गाणंही म्हटलं. ती छोटीशी अनौपचारिक मैफल कायम स्मरणात राहील.

विनायकचं हे भरल्या मैफलीतून अकाली उठून जाणं समस्त डोंबिवलीकरांना व त्याच्या गावोगावच्या चाहत्यांना चटका लावून गेलं आहे. बँकेतून निवृत्त होण्याआधीच त्याने जीवनातून व्ही.आर.एस. घेतली. आता कुणीही काही छान केलं, ऐकवलं की “वाsss क्या बात है !” अशी दाद देताना विनायकची न चुकता आठवण येईल. पूर्वीही यायची. पण तेव्हा ओठांवर हसू असायचं. आता डोळे पाणावतील.

  • महेश खरे
    १६ फेब्रुवारी २०२०
    (सौजन्य : टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली – पूर्व)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s