‘… तेच धनंजय कीरांचं खरं स्मारक होईल…!’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वा. सावरकर आदी नेत्यांची चरित्रे लिहिणारे सव्यसाची चरित्रकार आणि रत्नागिरीचे सुपुत्र धनंजय कीर यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, मुंबई दूरदर्शनचे निवृत्त सहायक संचालक जयू भाटकर यांनी लिहिलेला हा लेख…
……

धनंजय कीर हे नाव उच्चारल्यावर अपरिहार्यपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वा. सावरकर इत्यादींची जाडजूड चरित्रे डोळ्यासमोर उभी राहतात. उत्कृष्ट इंग्रजीत भारतीय नेतृत्वाच्या पहिल्या फळीतील महान व्यक्तींची इंग्रजी आणि मराठी चरित्रं लिहून भारतीय वाङ्मयाच्या इतिहासात ते अमर झाले.

धनंजय कीरांचं मूळ गाव रत्नागिरी शहराजवळचं जुवे हे लहानसं बेटावरचं गाव; मात्र त्यांचा जन्म रत्नागिरी शहरातील घुडेवठार येथील आजोळच्या घरी झाला. रत्नागिरीशी त्यांची नाळ अखेरपर्यंत जोडलेली राहिली. तेथून जवळच पाटीलवाडीमध्ये त्यांनी १९४० साली घर बांधलं. त्या घरी स्वा. सावरकर येऊन गेले त्या प्रसंगाचा उल्लेख ‘माझं घर कृतार्थ झालं,’ असा त्यांनी ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

योगायोग असा, की माझं घर त्यांच्या घरापासून अगदी जवळ, विलणकर वठारामध्ये. आमच्या घराकडून बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरच पाटीलवाडीतील त्यांचं घर होतं. मी रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळा क्र. ३ या प्राथमिक शाळेत असताना आम्हाला शिकवणारे मुख्याध्यापक आखाडे गुरुजी ही अभ्यासू व्यक्ती होती. त्यांचं अफाट वाचन आणि शिकवण्याची तळमळ यांचा आमच्यावर खूपच प्रभाव पडला.

आखाडे गुरुजी आमच्या घराजवळ बंदरकर चाळीत रहात. मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात धनंजय कीर रत्नागिरीस येतात हे समजल्यावर त्यांची भेट घेऊन एकदा गुरुजींनी त्यांना आमच्या शाळेत आणलं. तेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीचं पहिल्यांदा दर्शन झालं. कीर रत्नागिरीस मुक्कामाला असत तेव्हा सकाळच्या कोवळ्या उन्हात घरासमोरच्या रस्त्यावर ऊन खात उभे रहात, एवढा मोठा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चरित्रकार, पण त्याचं येणाऱ्या जाणाऱ्यांना काही अप्रूप असल्याचं कधी दिसलं नाही.

पदवीधर झाल्यावर ‘आकाशवाणी’च्या रत्नागिरी केंद्रात मी काही काळ हंगामी निवेदक म्हणून काम करत असे. तेव्हा प्रसिद्ध कवी महेश केळुसकर तिथे निर्मिती सहायक होते. आम्ही दोघे रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये एमए करत होतो. मी त्यांना कीरांविषयी सांगितलं, तेव्हा त्यांची मुलाखत घ्यायचं ठरवून आम्ही दोघे त्यांच्याकडे गेलो. ‘मुलाखतीत मी बोलेन त्यातलं काहीही सेन्सॉर करायचं नाही,’ अशी अट घालून धनंजय कीर तयार झाले. तत्कालीन कार्यक्रम अधिकारी दिगंबर पिंपळखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आवश्यक ती यंत्रसामग्री नेऊन त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची मुलाखत घेतली. मुलाखत घेतली आणि जशीच्या तशी प्रसारित केली.

मला आठवतं, ‘गांधी हे राजकीय संत होते,’ असं एक विधान त्यांनी मुलाखतीत केलं होतं. या स्पष्टवक्तेपणामुळेच धनंजय कीरांनी लिहिलेल्या पुस्तकांना विश्वासार्हता प्राप्त झाली.

१२ मे १९८४ रोजी कीरांचं निधन झालं. त्यांचे पुत्र डॉ. सुनीत हे केवळ वडिलांबद्दलच्या आणि त्यांनी बांधलेल्या घरावरच्या प्रेमापोटी मुंबई महापालिकेतील वैद्यकीय अधिकारीपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पत्नीसह रत्नागिरीस वास्तव्याला आले. त्यांच्या मातोश्री श्रीमती सुधाताईसुद्धा अखेरपर्यंत रत्नागिरीस राहिल्या.

१९९० साली ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ रत्नागिरीस झालं. याच संमेलनात ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ स्थापन करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी या संमेलनाचे खरे सूत्रधार होते. संमेलनाची तयारी करण्यासाठी गणेशोत्सवाचा दिवसांत रत्नागिरीत सभा झाली, तिला पुढे ‘कोमसाप’चे विश्वस्त झालेले डॉ. वि. म. शिंदे आणि अरुण नेरुरकर व कोषाध्यक्ष झालेले श्रीकांत तथा दादा शेट्ये उपस्थित होते. संमेलनाच्या प्रारंभी धनंजय कीर यांच्या निवासस्थानापासून साहित्य दिंडी काढण्यात यावी अशी कल्पना मी मांडली. ती मान्य झाली. त्या वेळी रवींद्र सुर्वे रत्नागिरीचे नगराध्यक्ष होते, या चरित्रकार सुपुत्राचा रत्नागिरी नगर परिषदेने मरणोत्तर ‘रत्नभूषण’ पुरस्काराने गौरव करावा आणि त्यांच्या पत्नी सुधाताई यांना तो स्वीकारण्यासाठी सन्मानाने निमंत्रित करावं, अशीही सूचना मी केली; पण संपूर्ण नगर परिषदेचं आवश्यक ते सहकार्य मिळालं नाही आणि ती अमलात आली नाही.

धनंजय कीरांनी लिहिलेल्या चरित्रांचं वाचन करून त्यांचं चरित्र लिहिण्याची प्रेरणा राजेंद्रप्रसाद मसुरकर या रत्नागिरी निवासी पत्रकाराला झाली आणि त्यांनी ‘चरित्रकाराचं चरित्र’ लिहून पूर्ण केलं. ते २०११ साली प्रकाशित झालं. मी महाविद्यालयात शिकत असताना मसुरकर हे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी होते. त्यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण चरित्राच्या प्रती शासनाने विकत घेतल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रंथालयांत पोहोचल्या.

याच मसुरकरांनी आता कीरांचं इंग्रजी चरित्र लिहिलंय. ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लॉकडाउनमुळे त्यांना छपाईच्या काही अडचणी येत असाव्यात. इंग्रजी चरित्राचं वैशिष्ट्य असं, की आपल्या मूळ मराठी पुस्तकाचं मसुरकर यांनी भाषांतर केलेलं नाही. ती पूर्णतः स्वतंत्र कलाकृती आहे. ‘कीर यांनी चरित्रं लिहिली ती भारतीय महापुरुषांच्या जीवनाचं दर्शन घडविण्यासाठी, पण त्यापूर्वी त्यांनी चरित्र लेखनाचा एक कला आणि शास्त्र म्हणून सांगोपांग अभ्यास केला. त्यांनी इंग्रजी भाषेचाही सखोल अभ्यास केला, त्यांच्या या व्यासंगी वृत्तीचा प्रभाव पडल्यामुळे मी त्यांचं चरित्र लिहिलं,’ असं मसुरकर यांनी मला त्यांच्या इंग्रजी पुस्तकाची माहिती देताना सांगितलं. या विद्वान चरित्रकाराचा अमराठी वाचकांना जीवनपरिचय व्हावा यासाठी आपण त्यांचं इंग्रजी चरित्र लिहिण्याचं ठरवलं आणि स्वतःच्या पुस्तकांचा अनुवाद न करता स्वतंत्र इंग्रजी लेखन करण्याची कीरांचीच पद्धत मी अनुसरली असं मसुरकर म्हणतात. मी त्यांच्या कार्याला सुयश चिंतितो.

धनंजय कीर यांच्यासारख्या लेखकरत्नाचा ‘पद्मभूषण’ पुरस्काराने भारत सरकारने १९७१ साली गौरव केला. रत्नागिरीत त्यांचं उचित स्मारक झालं पाहिजे. आठ-दहा वर्षांपूर्वी, महेश केळुसकर अध्यक्ष असताना, मी ‘कोमसाप’कडे त्यांच्या समग्र वाङ्मयावर चर्चासत्र आयोजित करावं अशी सूचना मांडली, या संस्थेच्या रत्नागिरीतील मुख्यालयाला ‘धनंजय कीर भवन’ असं नाव द्यावं अशीही पत्र पाठवून विनंती केली.

पाश्चात्यांचं अनुकरण ही भारतीयांची प्रवृत्ती आहे. साहित्याच्या प्रांतात अनेकदा शेक्सपिअरचा संदर्भ देण्यात येतो. भारतात, महाराष्ट्राच्या मातीत गावोगावी असे शेक्सपिअर होऊन गेले, वाङ्मयनिर्मितीत त्यांचं अमूल्य योगदान आहे. धनंजय कीर यांना अशा साहित्यिकांच्या पहिल्या पंक्तीचा मान आहे. त्यांनी निर्माण केलेल्या उच्च दर्जाच्या चरित्रवाङ्मयाने तो प्राप्त झाला आहे. योगायोग म्हणजे ‘पुस्तक दिन’ आणि शेक्सपिअर जयंती म्हणून पाळला जाणारा २३ एप्रिल हाच दिवस कीरांचाही जन्मदिवस आहे.

त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांखेरीज त्यांचं बरंच साहित्य अप्रकाशित राहिलं आहे. ते प्रसिद्ध करण्यासाठी मुंबई विद्यापीठ, कोमसाप यांसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. एकाहून एक सरस चरित्रग्रंथ लिहिणाऱ्या कीरांचा हस्तसामुद्रिकाचाही अभ्यास होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांसह जगभरातील अनेक नामवतांच्या तळहातांचे ठसे त्यांच्या संग्रहात होते. त्यांचे सुपुत्र डॉ. सुनीत यांनी ते जतन करून ठेवले आहेत. त्यांच्या ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या आत्मचरित्राची युवकांनी पारायणं करावीत, तेच त्यांचं खरं स्मारक होईल.

  • जयू भाटकर
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply