‘योजक’चा ‘योजक’ हरपला; नाना भिडे यांचे निधन

कोकणातील दुर्लक्षित फळांवर संशोधन करून त्यापासून दर्जेदार प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या ‘योजक असोसिएट्स’चे संस्थापक कृष्णा पर्शराम तथा नाना भिडे यांचे आज (१६ मे) सकाळी रत्नागिरीतील टिळक आळी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कोकणातील फळप्रक्रिया उत्पादनांचे नाव त्यांनी देशातच नव्हे, तर जगाच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवले. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख…
…………………………
अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्‌ ।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः।।

असे एक संस्कृत वचन आहे. त्या वचनाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रत्नागिरीच्या योजक असोसिएट्सचे कृ. प. तथा नाना भिडे. ‘नास्ति मूलमनौषधम्’ या उक्तीची खूणगाठ मनाशी बांधत कोकणातल्या वाया जाणाऱ्या तरीही अमूल्य अशा विविध फळांचा उपयोग करून घेऊन त्यांनी त्यांना व्यवसायमूल्य मिळवून दाखविण्याचे ‘योजक’त्व दाखविले आणि त्यासाठीच जणू आपल्या व्यवसायाचे नाव ‘योजक असोसिएट्स’ असे ठेवले. दुर्लक्षित कोकणी मेव्याचे आणि पर्यायाने कोकणाचे नाव उज्ज्वल करण्यात नाना भिडे यांचा मोलाचा वाटा आहे.

तीन जून १९३१ रोजी सोमेश्वरच्या वेसुर्लेवाडीत (ता. जि. रत्नागिरी) नानांचा जन्म झाला. रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वर खाडीवर रत्नागिरीपासून हाकेच्या अंतरावर सोमेश्वर गाव वसले आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये हे गाव रस्त्याने जोडले गेले आहे. मात्र त्यापूर्वी आणि मुख्य म्हणजे नानांच्या बालपणी त्यांच्या गावातून रत्नागिरी गाठणे दुर्लभ होते. तरीतून खाडी ओलांडून पलीकडे यावे लागत असे. त्यानंतर चालत दहा किलोमीटरवरची रत्नागिरी गाठता येत असे. अशा दुर्गम गावात सोयीसुविधांचा अभाव होताच. अशा काळात रत्नागिरीत येऊन नानांनी जुन्या अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तेव्हा त्यांच्या वडिलांचा उपाहारगृहाचा व्यवसाय रत्नागिरी शहराच्या सध्याच्या गोखले नाक्यावर होता. खास कोकणी चवीसाठी हे ‘भिडे उपाहारगृह’ तेव्हा प्रसिद्ध होते. १९५० साली एसएससी झाल्यानंतर नानांनी वडिलांच्याच उपाहारगृहाच्या व्यवसायात पडायचे ठरविले. मात्र काही कारणांनी उपाहारगृहाच्या जागेच्या मालकीचा प्रश्न निर्माण झाला. त्याबाबतचा खटला १९५० ते १९६० अशी दहा वर्षे उच्च न्यायालयात चालला. अखेर भिडे यांच्या बाजूने निर्णय झाला. त्यामुळे नव्या उमेदीने नानांनी तो व्यवसाय पुढे सुरू ठेवायचे निश्चित केले. तो करताना स्वतःचा वेगळा उद्योग असावा, अशी त्यांची मनस्वी जिद्द होती. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या उद्योगांना भेटी दिल्या. स्थानिक शेतकरी जीवनाचा जिल्हाभर फिरून अभ्यास केला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आंबा, काजू, करवंद, कोकम, फणस ही कोकणाची वैशिष्ट्यपूर्ण फळे असली, तरी शेतकऱ्यांना ती पुरेसे उत्पन्न मिळवून देऊ शकत नाहीत. कारण ही फळे नाशिवंत असल्याने ताज्या स्वरूपात त्यांचा वापर केला नाही, तर ती वाया जातात. त्यामुळे गरजेपुरती किंवा पुण्यामुंबईच्या चाकरमान्यांना देण्यापुरती फळे आणली, की बाकीची फळे रानातच पडून कुजून जात असत. त्यांच्यावर फणसपोळी, आंबापोळीसारख्या प्रक्रिया केल्या तरी त्या अगदी छोट्या स्वरूपातच होत असत. सुमारे नव्वद टक्के फळे प्रक्रियेविना वाया जातात. मूळ स्वरूपात केवळ दोन ते तीन टक्केच फळांचा वापर होतो. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन या दुर्लक्षित कोकणी मेव्याकडेच लक्ष द्यायचे नानांनी निश्चित केले आणि १९८० साली ‘योजक असोसिएट्स’ संस्थेची स्थापना केली.

‘योजक’मार्फत त्यांनी सर्वप्रथम कोकम सरबताचे व्यावसायिक उत्पादन बाजारात आणले. कोकमाचे आंबट पाणी कोण पिणार, अशी शंका तेव्हा उपस्थित केली गेली होती. आता मात्र कोकम सरबत हे कोकणाचे वैशिष्ट्य बनले आहे. नानांना लाभलेल्या दूरदृष्टीचेच हे फळ होते. यथावकाश कोकणातल्या रानात वाया जाणाऱ्या रानमेव्याकडेही नानांनी लक्ष दिले. करवंद, जांभूळ, कुडा या वनस्पतीची फुले, नाचणी, डोंगरी आवळा इत्यादी रानमेव्यावर प्रक्रिया करण्याचे त्यांचे सर्व प्रयोग यशस्वी झाले. करवंद वडी, जॅम, कुडाफूल सांडगा, जांभूळ ज्यूस, नाचणी सत्त्व, आवळा सरबत, जॅम, पेठा, मावा अशी अनेक दर्जेदार उत्पादने त्यांनी घेतली. त्यांच्या व्यावसायिक उत्पादनासाठी केंद्र सरकारच्या उद्योग संबंधित खात्यांकडून आवश्यक ते परवाने घेतले. सुरुवातीला १०० टन, तर सुमारे १२ वर्षांनी आणखी १०० टन उत्पादनासाठी त्यांनी परवाना मिळविला. २००० साली केवळ वाळवणासाठी तीन भव्य शेड्स त्यांनी पावसजवळच्या गोळप इथल्या माळरानावर उभारल्या. या उद्योगांमध्ये शंभराहून अधिक लोकांना रोजगार मिळालाच, पण त्याहीपेक्षा शेतकऱ्यांना त्यांच्या वाया जाणाऱ्या रानमेव्याची चांगली किंमत मिळाली.

अथक प्रयत्न करून तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीकडेही नानांनी योग्य ते लक्ष पुरविले. स्थानिक, तसेच देशी-परदेशी मार्केटचा अभ्यास केला. राज्यात आणि देशभरात विक्रीसाठी आवश्यक परवाने घेतले. जरूरीनुसार सुयोग्य पॅकिंग केले. ग्राहकांना योग्य दरात आपली उत्पादने मिळावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचा चांगला उपयोग झाला. योजक ब्रँड देशविदेशात नावाजला गेला. त्यांचे तीन पुत्र आणि सुनांचाही या साऱ्या उद्योगात मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या उद्योगाची धुरा मुले आणि सुनांनी लीलया पेलली आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्समधून पुढे आलेली गायिका शमिका भिडे ही नानांची नात.

उद्योग सांभाळतानाच नानांनी अभिनयाच्या आपल्या आवडीचीही जोपासना केली. विविध नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. वाचनाचा छंदही त्यांनी जाणीवपूर्वक जोपासला. नाट्यसंस्था आणि वाचनालये तसेच शैक्षणिक संस्थांना त्यांनी आर्थिक तसेच अन्य मदत वेळोवेळी केली.

नानांच्या उद्यमशीलतेची दखल विविध संस्था आणि शासनानेही घेतली होती. राज्य शासनाच्या विकास योजना कागदावरच न ठेवता त्या प्रत्यक्षात आणल्याबद्दल राज्य खादी ग्रामोद्योग मंडळावर त्यांची जिल्हा पातळीवर नियुक्ती केली. सांगलीचा व्यापारमित्र पुरस्कार (१९९७) आणि वसईचा २५ हजार रुपयांचा भाऊसाहेब वर्तक पुरस्कार (२००१) त्यांना मिळाला. नानांनी विविध समाजसेवी संस्थांसाठीही कार्य केले. फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज (रत्नागिरी), सेंट्रल कन्झ्युमर्स स्टोअर्स, भारत शिक्षण संस्था, पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, चित्पावन ब्राह्मण संघ, रत्नागिरीची वेदपाठशाळा, चिंचखरीतील दत्तमंदिर अशा संस्थांचा त्यात समावेश आहे. या सामाजिक कार्याबद्दल त्यांना साने गुरुजी आदर्श व्यक्ती पुरस्कार, ग्रंथमित्र पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा लोकमान्य टिळक पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

शिवाय योजक संस्थेकडून प्रेरणा घेऊन आता गावोगावीही अनेक प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. महिला बचत गटांना तर उत्पन्नाचे हमखास साधन उपलब्ध झाले असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल या उद्योगांमधून होत आहे. या साऱ्या प्रक्रियेचे जनकत्व नाना भिडे यांच्याकडेच जाते, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.

नानांच्या निधनामुळे कोकणातील फलोत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाला दिशा देणारा कल्पक उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • प्रमोद कोनकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s