रत्नागिरी : आज (२२ मे) रोजी मिरज येथून आलेल्या तपासणी अहवालांपैकी सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ४५५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३२ झाली आहे. त्यापैकी ९१ रुग्णांवर उपचार सुरू असून, ३७ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये गुहागर तालुक्यातील दोन, दापोली तालुक्यातील दोन, लांजा तालुक्यातील दोन आणि संगमेश्वर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात सापडलेले रुग्ण १७ मे रोजी मुंबईहून आले होते व त्यांना २० तारखेला अॅडमिट करण्यात आले होते. गुहागर तालुक्यात सापडलेले दोन रुग्ण श्रृंगारतळी येथील असून, त्या यापूर्वी सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत.
दापोली तालुक्यात सापडलेले दोन रुग्ण मूळचे देवके बुद्रुक येथील असून, ते मुंबईतून विरार येथून १६ मे रोजी आले व २० तारखेला त्यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगमेश्वर तालुक्यात सापडलेला एकमेव रुग्ण परचुरी येथील असून, त्याला साडवली येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाने चार जणांचा बळी घेतला आहे.
