रत्नागिरीत सहा जण करोनामुक्त; सिंधुदुर्गात आठ नवे रुग्ण; रत्नागिरीत १५ दिवसांत स्वॅब टेस्टिंग लॅब होणार

रत्नागिरी : रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज (२३ मे) सहा रुग्णांना उपचारांनंतर करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले. तसेच, आज मिरजमधून आलेले ११५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज रुग्णांमध्ये नवी वाढ झालेली नाही. रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात करोनाच्या निदानासाठी स्वॅब टेस्टिंग लॅब येत्या १५ दिवसांत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तिचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ मे) आठ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) करोनावर उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांना आज बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यातील रुग्ण साखरतर येथील, दोन रुग्ण नाखरे येथील, तर एक रुग्ण मेर्वी येथील आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये तीन महिला असून, तीन पुरुष आहेत. या व्यतिरिक्त एका महिला रुग्णासोबत रुग्णालयात असणाऱ्या १६ महिन्यांच्या मुलालाही आज घरी जाता आले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता ४२ झाली असून, ॲक्टिव्ह म्हणजेच सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ८५ झाली आहे. दरम्यान, आज मिरजमधून आलेले ११५ तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आज रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. करोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

करोनाच्या निदानासाठी रत्नागिरीतून स्वॅब मिरजला किंवा अन्य ठिकाणी पाठवावे लागत असल्याने निदानाला उशीर होत आहे; मात्र रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात करोनाविषयक तपासणीसाठी स्वॅब टेस्टिंग लॅब येत्या १५ दिवसांत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

ही लॅब उभारण्यासाठी एक कोटी सात लाख रुपयांचा निधी देण्याची हमी शासनाने दिली आहे. त्यामुळे लॅब सुरू करण्याच्या प्रयत्नाला चालना मिळणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे ही लॅब रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जागेची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत ही लॅब सुरू होऊ शकेल. त्यामुळे स्वॅब तपासणी अहवाल रत्नागिरीतच मिळणे शक्य होणार आहे. या लॅबचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मिळणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

सिंधुदुर्गातील रुग्णसंख्या १६
बरेच दिवस करोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ मे) एकदम आठ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे तेथील एकूण रुग्णसंख्या १६ झाली आहे.

आज पॉझिटिव्ह सापडलेल्या आठ जणांमध्ये कणकवली तालुक्यातील सहा, तर वैभववाडी आणि मालवण तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. कणकवली तालुक्यातील चार रुग्णांनी मुंबई प्रवास केला आहे, तर दोन व्यक्तींनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यातून प्रवास केला आहे. मालवण तालुक्यातील रुग्ण ठाण्यातून आलेला आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्ण मुंबईतून, प्रभादेवी येथून आलेला आहे. या नवीन आठ रुग्णांमध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या आठपैकी पाच जणांना घरी सोडण्यात आले असून, दोघांचे अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जुन्या आठपैकी एक आणि आज सापडलेले नवे आठ अशा एकूण नऊ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजपर्यंत एकूण ३६ हजार ६२८ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यात १६ हजार ३७८ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून, त्यापैकी ५१५ व्यक्ती शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. गावपातळीवर १५ हजार ८६३ व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात (होम क्वारंटाइन) ठेवण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply