रत्नागिरी : रत्नागिरीच्या बालरंगभूमी परिषदेने ऑनलाइन बाल-नाट्यकला स्पर्धा आयोजित केली आहे. लॉकडाउनच्या काळात घरात असलेल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मुलांनी पाच ते सात मिनिटांच्या एकपात्री सादरीकरणाचे व्हिडिओ पाठवायचे आहेत. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत पाच जून २०२० आहे.
पहिला गट पाच ते १० वर्षे वयाच्या मुला-मुलींसाठी असून, दुसरा गट ११ ते १५ वर्षे वयाच्या मुला-मुलींसाठी आहे. या स्पर्धेला कोणतेही प्रवेशमूल्य नसून, एकपात्री सादरीकरणाचा हा व्हिडिओ स्पर्धकांनी आपापल्या घरीच चित्रित करायचा आहे. पाच ते सात मिनिटांचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवणे अपेक्षित असून, त्यासाठीचे क्रमांक शेवटी दिले आहेत.
व्हिडिओ पाठवताना स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता, जन्मदिनांक आणि मोबाइल नंबर ही माहिती पाठवणे आवश्यक आहे. विजेत्या स्पर्धकांना सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदक देण्यात येईल. तसेच प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. विजेत्यांच्या व्हिडिओची सर्वत्र प्रसिद्धी करण्यात येणार आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेतर्फे आसावरी शेट्ये यांनी दिली आहे.
जास्तीत जास्त मुलामुलींनी या स्पर्धेत भाग घ्यावा. तसेच, स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी किरण जोशी (8408883158) किंवा आसावरी शेट्ये (7507416166) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक :
7507416166, 9923957447