रत्नागिरीत स्वॅब टेस्ट लॅब उभारण्याचा शासन निर्णय जारी; करोनाग्रस्तांमध्ये आज पाचने वाढ

रत्नागिरी : मिरज येथून आज (२५ मे) रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६१वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५५ रुग्णांना उपचारांनंतर पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करायला मान्यता देणारा शासन निर्णय राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज (२५ मे) जारी केला.

आज (२५ मे) सायंकाळी आलेले सर्व ३५ अहवाल निगेटिव्ह आले होते. रात्री पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील असा –
१) गुहागर ३१, पुरुष वेळंब, ता. गुहागर (भांडुप)
२) वय ६३, पुरुष, मुसलोंडी, बारगोडेवाडी, गुहागर (अंधेरी), (दोघे गुहागर रुग्णालयात)
३) वय २०, पुरुष, ४) वय २०, पुरुष, दोघेही पांगरी तर्फ वेळंब, (दोघेही संस्थात्मक क्वारंटाइन)
(वेळंब येथील आधीच्या रुग्णाच्या संपर्कात आलेले)
५) वय ४९, देऊड (चिखलगाव, जाकादेवी) मुंबई (रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल)

रत्नागिरीत स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करायला मान्यता
रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करायला मान्यता देणारा शासन निर्णय राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज (२५ मे) जारी केला.

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २० मे रोजी पाठविलेल्या पत्राचा संदर्भ देऊन या शासन निर्णयात म्हटले आहे, की रत्नागिरी जिल्ह्यात RT-PCR लॅब नसल्यामुळे करोनाच्या चाचणीसाठी स्वॅबचे नमुने मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे लागतात. रत्नागिरी ते मिरज हे अंतर दोनशे किलोमीटरपेक्षा अधिक आहे. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि दळणवळणाचा विचार करता अहवाल मिळण्यात आणि चाचणी होण्यात बराच वेळ आणि मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. मुंबई आणि पुण्यातील चाकरमानी कुटुंबे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यातील बहुतांश कुटुंबे कंटेनमेंट झोन, हॉटस्पॉट झोन किंवा रेड झोनमधील असल्यामुळे या सर्व नागरिकांची आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी करणे अनिवार्य ठरत आहे. या तपासणीसाठी आणि अहवाल मिळण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता सर्व नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे; मात्र त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर अनावश्यक ताण येत आहे. मोठ्या प्रमाणावर खर्चही होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात RT-PCR लॅब स्थापन करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नागपूर येथील एम्स संस्थेशी यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या संभाव्य खर्चाबाबत चर्चा केली. त्यासाठी एक कोटी सात लाख सहा हजार ९२० रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्ताव शासनाला मिळाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीची बाब म्हणून त्यासाठीचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करायला शासनाने मान्यता दिली आहे. या लॅबसाठी आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ आणि त्यावरील खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपलब्ध निधीतून करायलाही शासनाने मान्यता दिली.

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या २० मे पाठविलेल्या प्रस्तावाला अवघ्या पाच दिवसांत मंजुरी मिळाली आहे, हे विशेष. दुसऱ्या दिवशी २१ मे रोजी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दौरा झाला. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांशी करोनाविषयक स्थितीची चर्चा झाली; मात्र त्या वेळेपर्यंत शासनाकडे अर्ज सादर केला गेला नव्हता, असे दरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी डेरवण (ता. चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब व्हावी, अशी मागणी १३ मे रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली होती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांसाठी ते मध्यवर्ती ठिकाण होऊ शकेल, असे त्यांनी म्हटले होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply