रायपाटणच्या शेतकरी समूहाचा एक हजार डझन हापूस आंबा एसटीतून औरंगाबादला

राजापूर : एसटीने आंब्याची वाहतूक सुरू केल्याचा फायदा रायपाटण (ता. राजापूर) येथील शेतकरी समूहाला झाला. मालवाहतुकीच्या एकाच ट्रकमधून साडेतीन टन म्हणजे एक हजार डझन हापूस आंबा सोमवारी (ता. २५ मे) थेट औरंगाबादला रवाना झाला.

कोकणातील हापूस आंब्याला लॉकडाऊनच्या काळात राज्यभर प्रचंड मागणी होती. मात्र वाहतुकीवरच्या निर्बंधांमुळे खासगी वाहतुकीला मर्यादा होत्या. चौथ्या टप्प्यात वाहतुकीचे नियम शिथिल झाल्यानंतर एसटीने आधी प्रवासी वाहतूक सुरू केली. मात्र पहिल्या चार-पाच दिवसांत त्या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्याच दरम्यान मालट्रकमधून आंब्याची वाहतूक करणार असल्याचे एसटीचे निवेदन प्रसिद्ध झाले. साप्ताहिक कोकण मीडियाच्या वेबसाइटवर त्या निवेदनाची बातमी रविवारी (२४ मे) प्रसिद्ध झाली. ती वाचल्यानंतर रायपाटण (ता. राजापूर) येथील कोकणबाग या शेतकरी समूहाने तातडीने या सेवेचा लाभ घ्यायचे ठरवले. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ‘लाल परी’तून रायपाटण ते औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या मार्गावर आंबा रवाना झाला.

कोकणबाग या शेतकरी समूहाचे संचालक महेश पळसुलेदेसाई यांनी रायपाटण ते औरंगाबाद अशा लांब पल्ल्यासाठी मालवाहतूक मालट्रक आरक्षित केला. सोमवार पहाटे मालवाहतूक ट्रक रायपाटण येथे दाखल झाला. बसमध्ये साडेतीन टन म्हणजेच एक हजार डझन हापूस आंबा भरण्यात आला आणि वाहक-चालकासह ट्रक औरंगाबादच्या दिशेने रवाना झाला. यासाठी जिल्हा वाहतूक अधिकारी श्री. जगताप, श्री. मोरे यांनी सहकार्य केले. ‘कोकणबाग’चे संचालक महेश पळसुलेदेसाई, व्यंकटेश कल्याणकर, व्यवस्थापक दीपक पवार, मंदार गांगण आदींनी आंबा पाठविण्याची सारी व्यवस्था केली. या वेळी एसटीचे अनेक अधिकारी निरीक्षण करण्यासाठी आणि आंबा वाहतुकीची माहिती घेण्यासाठी उपस्थित होते. खासगी वाहतुकीपेक्षा कमी खर्चात आणि सुरक्षितपणे मालवाहतूक उपलब्ध करून दिल्याबद्दल महामंडळाचे आभारी आहोत. ही सेवा यापूर्वीच सुरू झाली असती तर अधिक लाभ झाला असता’, अशा प्रतिक्रिया पळसुलेदेसाई यांनी व्यक्त केली.

निवृत्तीपूर्वीचा ऐतिहासिक क्षण
औरंगाबादला निघालेल्या मालवाहतूक बसचे वाहक श्री. पवार येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मात्र मालवाहतूक करण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी या ट्रकमध्ये ड्युटी देण्याची विनंती केली. महामंडळानेही त्यांना ड्युटी देऊन ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेण्याची संधी त्यांना दिली.

Leave a Reply