करोनाच्या पार्श्वभूमीवर भातशेती; सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना ध्वनिचर्चासत्रातून मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सध्या करोनाच्या संसर्गाचे संकट मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे; मात्र खरीप हंगाम जवळ येत असल्याने कोकणाच्या शेतीतील महत्त्वाचे पीक असलेल्या भाताच्या लागवडीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरीप भात लागवडीचे नियोजन, तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर शेती करताना घायची काळजी याविषयी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना नुकतेच ध्वनिचर्चासत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील शिरगाव येथील भात संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ध्वनिचर्चासत्राद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात भात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांना भातलागवडीविषयी मार्गदर्शन केले. भात लागवडीसाठी जमिनीची मशागत कशी करावी, आपल्या प्रभागांनुसार जातीची निवड कशी करावी, भाताच्या विविध जातींचा लागवड कालावधी व त्याचे योग्य नियोजन, भात लागवडीच्या विविध शास्त्रीय पद्धती, भात लागवडीनंतरचे नियोजन, खत व्यवस्थापन, रोपवाटिका नियोजन, भात संशोधन केंद्रामार्फत विकसित केलेल्या भाताच्या विविध जाती आदींबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर भात लागवड करताना शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) कसे राखावे, शेतात काम करताना व करून आल्यावर आपली वैयक्तिक स्वछता कशी राखावी याची माहिती किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार त्ज्ज्ञ डॉ. विलास सावंत यांनी शेतकऱ्यांना दिली.

रिलायन्स फाउंडेशनचे कृषितज्ज्ञ सचिन मताले यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी केले. तसेच कार्यक्रमाची तांत्रिक बाजू रिलायन्स फाउंडेशनचे धम्मदीप गोंडाणे यांनी सांभाळली आणि नियोजन गणपत गावडे यांनी केले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

Leave a Reply